वसई-विरारचे रस्ते दिवाळीपूर्वी चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारचे रस्ते दिवाळीपूर्वी चकाचक
वसई-विरारचे रस्ते दिवाळीपूर्वी चकाचक

वसई-विरारचे रस्ते दिवाळीपूर्वी चकाचक

sakal_logo
By

वसई ता. १८ (बातमीदार) : वसई-विरार शहरात परतीच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच या पावसामुळे हे रस्ते दुरुस्त करण्यात अडचणी येत होत्या; मात्र पावसाने उसंत घेतल्यावर महापालिकेने रस्तेदुरुस्तीच्या कामास सुरुवात केली असून दिवाळीपूर्वी रस्ते चकाचक झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महापालिका क्षेत्रातील वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव शहरात रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली. यामुळे वाहनचालक, सर्वसामान्य नागरिकांना खड्डे चुकवीत प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दुर्घटनादेखील घडतात. त्यामुळे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत होती; परंतु पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरवली होती, तर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणचे मार्ग दुरुस्त केले, तिथे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग बांधवांसह सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करतांना गैरसोईला सामोरे जावे लागत होते.
वसई विरार शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच उड्डाणपुलांचा अभाव असल्याने रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो; परंतु खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सध्या रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ठिकठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---------------------
वसई विरार शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली असून अभियंत्यांना रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. दिवाळीआधी रस्तेदुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, महापालिका
-----------------
रस्ते नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे; पण रस्ते दुरुस्त करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असल्याने आत आमचा प्रवास सुखकर होणार आहे.
- कल्पेश व्यास, नागरिक