आयुक्तालयात ऑनलाईन फसवणूकीचे अडीचशे गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तालयात ऑनलाईन फसवणूकीचे अडीचशे गुन्हे
आयुक्तालयात ऑनलाईन फसवणूकीचे अडीचशे गुन्हे

आयुक्तालयात ऑनलाईन फसवणूकीचे अडीचशे गुन्हे

sakal_logo
By

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑनलाईन फसवणूक करून पैसे उकळल्याचे गेल्या दोन वर्षांत अडीचशेहून अधिक गुन्हे घडले आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे उघड झाले आहे.
ऑनलाईन फसवणुकीमध्ये प्रामुख्याने आरोपींकडून समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्याची सर्व माहिती, ओटीपी क्रमांक व इतर माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात. शेअर बाजार, पैसे हस्तांतरण, एटीएममधून पैसे काढण्यास मदत करणे, सोशल मीडिया तसेच मोबाईल ॲप आदी पद्धतीने फसवणूक केली जाते. यात वरिष्ठ नागरिकांना सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन फसवणुकीचे २६० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ९४ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून १४८ आरोपींना अटक केली आहे. तसेच या आरोपींना त्या गुन्ह्याची शिक्षादेखील मिळाली आहे. यातील १२८ गुन्हे ऑक्टोबर २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत दाखल होते. त्यापैकी ५१ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे; तर जानेवारी २०२२ ते ऑक्टोब २०२२ या कालावधीत फसवणुकीचे १३२ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ४३ गुन्हे उघडकीस आणले असून ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
....
फसवणूक झाल्यास काय कराल?
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या फसवणुकीत सर्वसामान्य माणसांना त्यांची फसवणूक कशा प्रकारे झाली, याची माहिती नसते. तसेच फसवणूक झाल्यानंतर काय करायला हवे व कशा प्रकारे आपले पैसे परत येतील, याबाबतदेखील सर्वसामान्य माणसांना ज्ञान नसते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झाली असल्यास ताबडतोब जवळच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. याशिवाय ज्या बँकेत खाते असेल, त्यांना ताबडतोब माहिती देऊन आपले खाते बंद करावे. सोशल मीडिया किंवा एखाद्या ॲपमार्फत कोणतीही वस्तू विकत घेताना अथवा ऑनलाईन व्यवहार करताना त्याबाबत पूर्ण माहिती घेऊन मगच आर्थिक व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.