धनधान्य समृद्धीसाठी आठविंदा संस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनधान्य समृद्धीसाठी आठविंदा संस्कृती
धनधान्य समृद्धीसाठी आठविंदा संस्कृती

धनधान्य समृद्धीसाठी आठविंदा संस्कृती

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : आधुनिक काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार अनेकविध बदल झालेले दिसत आहेत; परंतु विक्रमगड व परिसरातील खेड्यापाड्यांत आजही पूर्वापार चालत आलेली परंपराच जोपासली जात आहे. येथे आठ दिवस अगोदरच दिवाळी सणाला सुरुवात होते. या वेळी आठविंदे काढून संस्कृती जपली जाते.
शहरामध्ये लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, भाऊबीज, पाडवा या दिवसांना जास्त महत्त्व दिले जाते; परंतु विक्रमगड व ग्रामीण भागात सगळेच सण व उत्सवांतील दिवस सणाच्या आदल्या दिवसापासून ते सणाच्या शेवटपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच साजरे केले जातात. दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा होत असल्याने दिव्यांना या सणात जास्त महत्त्व असते. दीपमांगल्य या पार्श्वभूमीवर आठविंदे म्हणजे मुख्य दिवाळीपासून जवळजवळ सहा दिवस अगोदरपासूनच दिवाळीची सुरुवात केली जाते. या दिवशी सायंकाळी महिलांकडून घरासमोरील अंगणात सडा सारवण केले जाते. अंगणात सायंकाळच्या सुमारास लाकडे पेटवून तयार होणाऱ्या राखेपासून आठविंदे काढले जातात. आठविंदे म्हणजे थोडक्यात भात साठवण्याची कणगे व मानवी आकृत्या, देवी-देवता, चंद्र, तारे, मानवी प्रतीकात्मक चित्रे काढली जातात. ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेली ही एक संस्कृती आजही जोपासलेली आहे.
थोडक्यात, शहरापेक्षा ग्रामीण भागात दिवाळीची सुरुवातही जवळजवळ आठवडाभर अगोदरच सुरू होते. या दिवसापासून वर्षभर अडगळीत पडलेल्या मातीच्या पणत्या बाहेर येतात व सर्वत्र गावात, खेड्यांत दिव्यांनी प्रज्वलित असलेले दृष्य दिसते. या दिवसापासून दीप प्रज्वलित केले जातात. त्यामुळे आजही विक्रमगड व परिसरात पारंपरिक पद्धतीनेच दीपावली सण मोठ्या भक्तिभावाने आनंदात साजरा केला जातो.

…………….

अन्नधान्याच्या भरभराटीसाठी उपासना
घरात कधीही अन्नधान्यांची कमरता पडू नये व धान्य कणग्यांप्रमाणे भरभरून राहिले पाहिजे, यासाठी कणग्याची चित्रे दारासमोर काढून त्याची पूजा केली जाते. अशा आठविंदे काढून त्यांची विधिवत पूजा केली जाते.

……………...

दूध, पीठ, काकडीचा नैवेद्य
या वेळी नैवेद्य म्हणून आगळावेगळा पदार्थ तयार केला जातो. दूध व गव्हाच्या पिठात काकडी टाकून गूळ, तूप घालून त्याचे मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण पोळीसारखे लाटून पोळी तव्यावर तयार करून प्रसाद केला जातो.

विक्रमगड : ग्रामीण भागात घराच्या अंगणात देवी-देवतांचे, मनुष्याचे तसेच भाताच्या कनग्यांच्या राखेपासून काढलेल्या प्रतिकृती.
(छायाचित्र ः अमोल सांबरे)