‘अपोलो’च्या शिरपेचात मानाचा तुरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अपोलो’च्या शिरपेचात मानाचा तुरा
‘अपोलो’च्या शिरपेचात मानाचा तुरा

‘अपोलो’च्या शिरपेचात मानाचा तुरा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : नवी मुंबई येथील अपोलो रुणालयाने पाच वर्षांत ५३ बालरुग्‍णांचे यशस्‍वी यकृत प्रत्‍यारोपण करून त्‍यांना जीवदान दिले आहे. तसेच यकृत प्रत्यारोपणाचा आणखी विस्तार व्हावा, यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हेपॅटोबिलियरी पॅनक्रियाटिक प्रत्यारोपण शल्यचिकित्सक प्राध्यापक डॅरियस मिर्झा यांच्या वैद्यकीय नेतृत्‍वाखाली यकृत प्रत्यारोपणाचा हा विस्तार होणार आहे. या निमित्ताने अपोलो रुग्णालय आणि बॉम्बे रुग्णालय यांच्यात मुंबईतील एका कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला.
या वेळेस अपोलो रुग्णालयाचे पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ डॉ. संतोष मराठे, बॉम्बे रुग्णालय अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

केस स्‍टडी
कल्याणमध्ये राहणारा ३ वर्षीय रुषान वर्मा या बाळाला जन्माच्या १० दिवसांनतर कावीळ झाली होती. तिथेच एका स्थानिक रुणालयात काही दिवस दाखल करून उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला; पण पुन्हा तीन महिन्यांनी त्याला सारखीच लक्षणे दिसू लागली. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्याच्या यकृताला सूज आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला बॉम्बे रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना यकृत स्पेशालिस्टकडे जाण्यास सांगितले. चाचण्या केल्यानंतर त्याला बिलेरिया ॲट्राशियाचे निदान झाले. काही उपचार सुरू केले; पण त्याची प्रकृती ढासळत होती. त्याला शस्त्रक्रियेची गरज होती. त्यानुसार तो ११ महिन्यांचा असताना त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण केले गेले. २५ ऑगस्ट २०२० या दिवशी त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आता दोन वर्षे झाले आहेत; पण तो सर्व सामान्य मुलांसारखाच वावरतो. जवळपास ३० लाख रुपये या संपूर्ण प्रक्रियेला खर्च झाले आहेत. रुषानला त्याची आई वृशाली वर्मा यांनी यकृत दिले आहे. १५ लाख रुपये एका संस्थेतर्फे डोनेशन मिळाले होते.
याचप्रमाणे धारावीत राहणारा कार्तिक सात वर्षांचा असताना आत्याने केलेल्या यकृत दानामुळे त्याला जीवदान मिळाले. त्यालाही जन्मापासून कावीळ होती. त्यामुळे, यकृतावर मोठा परिणाम झाला. कार्तिकच्या यकृत प्रत्यारोपणासाठी सुरुवातीपासून जवळपास ४० लाख रुपये खर्च आला आहे. किटो या संस्थेने दिलेल्या १५ लाखाच्या दानामुळे खूप मोठी मदत झाल्याचे कार्तिकची मावशी प्रिया नाडर यांनी सांगितले.

कार्तिक आणि रुषान या दोघांसारख्या एकूण ५३ बाल रुग्णांवर नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयातील सुसज्ज डॉक्टरांच्या टीमने यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले आहे.

अपोलो रुग्णालयातर्फे दर वर्षी १५ टक्के यकृत प्रत्यारोपण केले जातात. आतापर्यंत ४ हजारांहून अधिक यकृत प्रत्यारोपण केली गेली आहेत. यासह ५० हून अधिक देशांतील रुग्णांना सेवा दिली जात आहे. बॉम्बे रुग्णालयासह केलेल्या सामंजस्य करारामुळे रुग्णांना फायदा होणार आहे.
– प्रीथा रेड्डी, कार्यकारी उपाध्यक्षा, अपोलो रुग्णालय समूह