नागरी सुविधांसाठी सिडकोचे भूखंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी सुविधांसाठी सिडकोचे भूखंड
नागरी सुविधांसाठी सिडकोचे भूखंड

नागरी सुविधांसाठी सिडकोचे भूखंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः नवी मुंबई महापालिकेला विविध नागरी पायाभूत सुविधांसाठी भूखंड देण्याबाबत सिडकोने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी याच अनुषंगाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली होती. या निर्णयामुळे शहरातील बाल, महिला भवन, खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्याने, आरोग्य केंद्र, टाटा पॉवरखालील नर्सरी, बेलापूर गावातील कुस्तीचे मैदान, शूटिंग रेंज आणि शिरवणे गणेश मंदिराचा विषय मार्गी लागणार आहे.
शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी मंदा म्हात्रे यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला व बाल विकास कल्याणासाठी म्हात्रे यांनी सिडकोकडे वेगवेगळ्या भूखंडांची मागणी केली होती. याच अनुषंगाने म्हात्रे यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळाने संजय मुखर्जी यांची सिडको कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान बेलापूर ग्रामस्थांच्या समस्या, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्याने, हरित पट्टे, आरोग्य केंद्र, कुस्तीचे मैदान अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, जनार्दन म्हात्रे, प्रदीप पाटील, नरेश गौरी, विकास मोकल, रूपेश चव्हाण; तसेच सिडकोचे मुख्य नियोजनकार व्ही. वेणुगोपाल, शहरसेवा व्यवस्थापक दीपक जोगी, प्रशासन महाव्यवस्थापक जगदीश राठोड, सामाजिक सेवा अधिकारी प्रशांत भांगरे आदी अधिकारी उपस्थित होते.
---------------------------------------------------
भूखंडांचे लवकरच सर्वेक्षण
बेलापूर मतदारसंघातील विविध बाबींसाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत सिडको सहव्यवस्थापकीय संचालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भूखंडांचे सर्वेक्षण करून ते उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी मुखर्जी यांनी सूचित केले आहे. तसेच नेरूळ येथे महिला व सीबीडी येथे बाल भवन उभारण्यासही भूखंड देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.