
दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या
वसई, ता. १८ (बातमीदार) : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणासुदीला लागणारे साहित्य पालघर जिल्ह्यातील विविध भागांतील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. यामुळे आकाश कंदील, रांगोळी, फराळ साहित्य, कपडे, पणत्या, लखलखते दिवे अशा साहित्याने दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत; मात्र यंदा महागाईची झळ बसल्याने नागरिकांची पावले तुरळक प्रमाणात खरेदीकडे वळली आहेत.
जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेत, गजबजलेल्या ठिकाणी छोटे-मोठे व्यावसायिक दिवाळी वस्तूंची विक्री करत आहेत. आकाश कंदील, रांगोळी, फराळ साहित्य, कपडे, पणत्या, लखलखते दिवे यासह विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणला आहे; तर
दिवाळीला आंघोळ करताना लागणारी चिरेटीची विक्री केली जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. तसेच बांबूपासून आकाशकंदील निर्मिती केली जात आहे. बांबूचा वापर करताना सुंदर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारात चांगली मागणी आहे.
आकाश कंदिलाच्या किमतीत यंदा ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यात चौकोनी, त्रिकोणी अशा विविध आकाराचे नक्षीदार आकाशकंदील उपलब्ध झाले आहेत; तर रोषणाईचे दिवे १०० रुपयांनी महागले आहेत. व्यापारी वर्गाने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांना रोषणाई केली आहे. सूट देणारे फलकदेखील लावण्यात आले आहेत; तर विविध प्रकारचे आकाशकंदील दर्शनी भागात दिसून येत आहेत, पण यंदा महागाईमुळे खरेदीसाठी कमी संख्येने नागरिक येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-----------------
पर्यावरणपूरक आकाशकंदील
कपड्यापासून तयार करण्यात येणारे आकाशकंदील पुन्हा वापरू शकतो. त्यामुळे त्यांना अधिक पसंती दिली जात आहे. तसेच कागद आणि बांबूपासून तयार केलेले आकाशकंदीलदेखील बाजारात आले आहेत. पूर्ण घराला दिव्यांनी उजळवण्यासाठी छोटे कंदीलदेखील खरेदी केले जात आहेत; मात्र यंदा पर्यावरणपूरक आकाश कंदिलांना मागणी वाढली आहे.
-------------------
पारंपरिक पणत्या
कच्च्या मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या पणत्यांना रंगरंगोटी करून आकर्षक नक्षी काढण्यात येते. त्यामुळे त्या अधिक रंगतदार दिसतात व पुनर्वापरदेखील होतो. यासाठी ग्राहक पारंपरिक पद्धतीने मातीच्या पणत्या विकत घेत आहेत.
------------------
फटाक्यांची दुकाने तयारीत
दिवाळीत फटाक्यांचा आनंद बच्चे कंपनीपासून ते मोठे घेत असतात. फटाक्यांच्या दुकानासाठी जागा निश्चित करण्यात आली असून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे मंडप घातले जात आहेत. त्यामुळे फटाके कधी मिळणार याची वाट लहान मुले पाहत आहेत.
----------------------
असे आहेत दर
प्रकार - पूर्वीचे - आताचे
छोटे आकाशकंदील - २० - ३०
मोठे आकाशकंदील - १०० ते ७०० - १५० ते ८००
रोषणाईचे दिवे - १०० - २००
पणत्या - १०० - १३० रुपये डझन
रांगोळी - २० - ४० पेला