कासाडी नदीवर प्रदूषणाचा घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासाडी नदीवर प्रदूषणाचा घाला
कासाडी नदीवर प्रदूषणाचा घाला

कासाडी नदीवर प्रदूषणाचा घाला

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.१८ (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांमधून पुन्हा घातक रसायनांचे पाणी नदीमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. केमिकलयुक्त पाण्यामुळे नदीतील जलचरांसोबत गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. नदी किनारी होत असणारी शेती सुद्धा धोक्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय हरीत लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कान टोचले आहेत. परंतु, निद्रिस्त गेलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होत नाही.
डोंगर रांगांतून उगम पावणारी कासाडी नदी तळोजा औद्योगिक वसाहतींमधून प्रवाहित होत कामोठे खाडीतून समुद्राला भेटते. या नदीच्या एका बाजूला एक हजार पेक्षा जास्त घातक रसायने आणि रासायनिक कचरा निर्माण करणाऱ्या बलाढ्य कंपन्या, तर दुसऱ्या बाजूला गावे व रहिवासी वसाहती आहेत. एमआयडीसीतील बहुतांश कारखान्यांचे सांडपाण्याच्या वाहिन्या थेट नदीच्या किनारी सोडण्यात आल्या आहेत. या पाण्यावर प्रक्रियाकरून शुद्ध करून नदीत सोडण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया केंद्र तयार केले आहे. मात्र बऱ्याच कंपन्या या केंद्रात पाणी न सोडता थेट प्रक्रीया न करता नदीत केमिकलचे पाणी सोडत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून डोंगऱ्याचा पाडा, देवीचा पाडा, पडघे, तळोजा, रोडपाली, कामोठे आणि खारघर पर्यंतच्या वसाहतींना दुर्गंधीयुक्त वास सुटत आहे. तर ज्या भागातून नदीचा प्रवाह जातो, येथील सर्व रहिवाशी परीसरातील नागरीकांना त्रास होत आहे. पडघे गावाच्या आजूबाजूला नदीच्या पाण्यावर शेती केली जाते. मात्र, ही शेती देखील केमिकलयुक्त पाण्याने धोक्यात आली आहे. केमिकलयुक्त पाणी सोडणे एवढे नियमित झाले आहे, की आता स्थानिक ग्रामस्थांनाही त्याची सवय झाली आहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे तळोजा विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी डी. बी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कनिष्ठ अधिकारी सचिन अडकर यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले, मात्र अडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
------------------------------------------
रसायनांमुळे नदीचे अस्तित्वपणाला
नागरिकांना दमा, क्षयरोग, छातीत दुखणे तसेच डोळ्यांचे विकार होत आहेत. मुलांच्या शारीरीक वाढीवर परिणाम होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कारखानदार रात्रीच्या वेळेस घातक रसायने मिश्रित पाणी सोडतात. तसेच तळोजा एमआयडीतील काही घातक रसायनांचे टँकर धुण्याचे सेंटर देखील खोलले आहेत. त्यामुळे नदीचे प्रदूषण होत आहे.
------------------------------------------
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कारवाईचा फार्स
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तळोजा एमआयडीसीतील कोणते कारखाने प्रदूषणकारी आहेत, याची चांगली माहिती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी या कारखान्यांवर कारवाईत करीत पाणी कपातीचे आदेश सुद्धा महामंडळाने दिले होते. तसेच कारखाने बंद करण्याचा निर्णय सुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतला होता. मात्र, या कारवाया फक्त दिखाव्यापूरतेच होत असल्याने अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
़़़़़़़़़------------------------------------
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. पण आपण आरोग्यदायी जीवन जगत आहोत का? हा खरा प्रश्न आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे अनेक नागरिक कळंबोली, खारघर येथील स्वतःचे घर विकून जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे हे अपयश आहे. त्यांना सर्व माहिती असते, पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
-़प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते कळंबोली
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़---------------------------------------
तळोजा एमआयडीसीत आणि परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. इथले नागरिक श्वसनाच्या विकाराने त्रस्त आहेत. औद्योगिक वसाहतीपासून दूरवर पनवेल, कामोठा, बेलापूर, पलावा या ठिकाणच्या वसाहतींनाही या वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
-विजय दरे, स्थानिक रहिवासी