कामोठेतील इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठेतील इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
कामोठेतील इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

कामोठेतील इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : धोकादायक इमारत पाडण्याचे काम करणाऱ्या पोकलेन ऑपरेटरवर राडारोडा कोसळल्याने ढिगाऱ्याखाली सापडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना कामोठे सेक्टर ३५ मध्ये शनिवारी (ता. १५) घडली होती. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी कंत्राटदार आणि ब्ल्यू हेवन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कामोठे सेक्टर-३५ मधील ब्ल्यू हेवन ही इमारत १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती; मात्र निकृष्ट बांधकामामुळे काही वर्षांतच ती धोकादायक झाली होती. पनवेल महापालिकेने सदर इमारत अतिधोकादायक जाहीर केली. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी इमारत स्वखर्चाने जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर केला होता. त्याला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. १५ ऑक्टोबर रोजी दोन पोकलेनच्या साह्याने सदर धोकादायक इमारत पाडण्याचे काम करण्यात येत होते. सायंकाळी इमारतीचा काही भाग पोकलेनवर कोसळला. या वेळी पोकलेनवरील एका कामगाराने वेळीच उडी मारल्याने तो बचावला; मात्र पोकलेन ऑपरेटर मुजिबूर रेहमान (वय २२) हा सदर ढिगाऱ्याखाली अडकून पडला. कामोठे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा उपसून त्याचा मृतदेह बाहेर काढला. कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न पुरवल्याने पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात आढळून आले.