जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १८ : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत विविध पक्षाला व परिवर्तन पॅनेलला यश आले. मात्र यात प्रस्थापित बहुजन विकास आघाडीसह भाजप, शिंदे गट, मनसेने जिल्ह्यात पाय रोवले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हा पिंजून काढला होता. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात संपर्क दांडगा आहे. शिंदे यांनी ठाकरेंशी फारकत घेतल्यावर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार श्रीनिवास वनगा यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या संपर्कात आले. अशातच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संघटनेला बळ आले आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ग्रामपंचायतीवर विजयश्री खेचून आणली. त्यात बहुजन विकास आघाडीने देखील यंदा २३ ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. एकीकडे बहुजन विकास आघाडीचे वसई, नालासोपारा व बोईसर मतदार संघात तीन आमदार, वसई विरार महापालिकेवर सत्ता आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर सदस्य असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायत काबीज करण्यात यश आले आहे. त्यातच जिजाऊ संघटनेने देखील ग्रामपंचायतीत विजय प्राप्त करून पुढील प्रवास अधिक जोमाने सुरू केला आहे.
भाजपने जागा मिळवल्या आहेत त्यातच पालकमंत्री देखील भाजपचे आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण पुढे कोणती जादुई कांडी फिरवतील हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीनेही आपले वर्चस्व ठेवले आहे. त्यातच माजी आमदार विलास तरे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वसई पूर्व ते बोईसर पट्ट्यात संघटनेला बळ मिळू शकते. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने यावेळी समाधानकारक कामगिरी केली आहे. परंतु शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे त्यामुळे भविष्यात ठाकरे की शिंदे या लढाईत मनसे, बविआ आणि भाजप देखील आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे.

मनसेचा जिल्ह्यात शिरकाव
मनसेही या निवडणुकीत कमाल केली असून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य काही भागात निवडून आले आहेत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील यामुळे बळ मिळणार आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील जादू दिसू शकते. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील अनेक भागात निर्माण होणाऱ्या समस्या असोत किंवा विकासाबाबतचे प्रश्‍न याबाबत आवाज उठवला आहे. परिणामी यापुढे होणाऱ्या वसई विरार महापालिका, जव्हार नगरपरिषदेसह अन्य निवडणुकांत मनसे सहभागी होणार असे चित्र सध्याच्या निवडणुकीवरून दिसून येत आहे.