
मुख्यमंत्र्यांकडून ठाणेकरांना स्वरदीपावलीची भेट
ठाणे, ता. १८ : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांसाठी स्वरदीपावली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २२) होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री ठाणेकरांच्या भेटीस आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. दरवर्षी ठाणेकरांसाठी दीपावलीनिमित्त संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक चौक येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजता स्वरदीपावली हा संगीतमय कार्यक्रम ठाणेकरांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना नवीन व जुन्या मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. हा स्वरदीपावली कार्यकम बहारदार करण्यासाठी अभिनेते अंशुमन विचारे, मानसी नाईक, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना, कविता राम, प्रसेनजीत कोसंबी, अक्षता सावंत, जगदीश पाटील, तेजा देवकर, सुकन्या काळण, हेमलता बाणे आदी नामवंत गायक-अभिनेते सहभागी होणार आहेत.