
बेस्ट बसमध्ये पाकिटमारी करणारी टोळी गजाआड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : बेस्ट बसमधील प्रवाशांना टार्गेट करत पाकीटमारी करणाऱ्या पाच जणांच्या सराईत टोळीला मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले. आरोपी टोळी अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. तब्बल ४० गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून बेस्ट बसची चार स्मार्ट कार्ड जप्त केली.
१७ ऑक्टोबरला मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट १२च्या अधिकाऱ्यांना संशयितांबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. बोरिवली पूर्व येथील ओंकारेश्वर मंदिर बेस्ट बसस्थानकावर खिसेकापूंची टोळी उपस्थित असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अधिकाऱ्याला कळले, की हे सर्व सदस्य चोरीच्या कारवाया करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
...
आरोपींची नावे
राजाराम रामदास पाटील, अब्दुल कादर शहा ऊर्फ छोटा अब्दुल, रफिक वकील शेख, संजय प्रभाकर त्रिंबके आणि महादेव वसंत माने अशी आरोपींची नावे आहेत. मुंबई शहर आणि लगतच्या भागांतील विविध पोलिस ठाण्यांत आरोपींविरुद्ध ४० गुन्हे दाखल आहेत.