६५ बांधकाम व्यावसायिकांबाबत ईडीची केडीएमसीकडे विचारणा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६५ बांधकाम व्यावसायिकांबाबत
ईडीची केडीएमसीकडे विचारणा?
६५ बांधकाम व्यावसायिकांबाबत ईडीची केडीएमसीकडे विचारणा?

६५ बांधकाम व्यावसायिकांबाबत ईडीची केडीएमसीकडे विचारणा?

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १८ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेत ६५ बांधकाम व्यावसायिकांनी महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. त्यापाठोपाठ आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणातील कागदपत्रे महापालिका प्रशासनाकडून मागवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्याबाबत बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेचे बेकायदा बांधकाम प्रमाणपत्र बनवून रेराला सादर केले होते. त्यामुळे रेराने ६५ बांधकाम व्यावसायिकांना दिलेली नोंदणी रद्द केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ६५ विकसकांविरोधात मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतत ठाणे गुन्हे शाखा तसेच विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. त्यापाठोपाठ आता ‘ईडी’नेही महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. त्यात महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विकसकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच विकसकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची माहिती ‘ईडी’ला द्यावी. महारेरा प्रमाणपत्रे जारी करताना आढळून आलेला गैरव्यवहार आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे अशा प्रमाणपत्रांचे लाभार्थी (विकसक) तसेच कागदपत्रे असलेल्या फाईलची प्रतही सादर करण्यास ‘ईडी’ने सांगितले आहे. दरम्यान, याविषयी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.
-----
अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा!
याविषयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणात विकसकांसह महापालिका अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची आणि प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली होती.