पुण्यातील ‘ज्ञानदीप’ला अनियमितता भोवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील ‘ज्ञानदीप’ला अनियमितता भोवणार
पुण्यातील ‘ज्ञानदीप’ला अनियमितता भोवणार

पुण्यातील ‘ज्ञानदीप’ला अनियमितता भोवणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या ‘महाज्योती’ संस्थेमध्ये कोट्यवधींचा कोचिंग क्लासेस घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाची मात्र पुण्यातील ‘ज्ञानदीप’ ॲकॅडमीवर विशेष मेहेरबानी असल्याचे दिसून येते. तब्बल १५ ते १८ कोटींचे हे काम टेंडर न काढताच ‘ज्ञानदीप’ला देण्यात आले असून या प्रकरणात विभागाच्या मंत्र्यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मोठा गाजावाजा होताच संबंधित ‘ज्ञानदीप’ संस्थेवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे मंत्रालयातून खात्रीशीररीत्या समजते.
‘महाज्योती’कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. ‘महाज्योती’ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर ‘ज्ञानदीप’ या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला. परीक्षेसाठी २७ वैकल्पिक विषय आहेत. त्यामुळे किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. एकाच संस्थेत दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना गुणवत्तेबाबत तडजोड होते, शिवाय वैकल्पिक विषयांसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत नाही, आदी शंका विद्यार्थ्यांमध्ये होत्या.
त्याआधी ‘महाज्योती’ने एमपीएससी पूर्वपरीक्षा प्रशिक्षणासाठी ६ ऑक्टोबरला पत्र काढून ‘ज्ञानदीप’ ॲकॅडमी पुणे येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी व छायांकित प्रती जमा करण्याची सूचना केली. त्यानंतर अचानकपणे १० ऑक्टोबरला परिपत्रक काढून कागदपत्रे जमा करण्यास स्थगिती दिली; तर १४ ऑक्टोबरला पुन्हा नवे परिपत्रक काढून ‘ज्ञानदीप’ ॲकॅडमीमध्ये १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
...
शुल्कात वाढ
राज्यसेवा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी प्रतिविद्यार्थी ४६ हजार रुपयाप्रमाणे हे एका वर्षाचे टेंडर फ्रेम केले होते; मात्र एमपीएससीने आपले अभ्यासक्रम यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवर बदलले. त्यामुळे ‘ज्ञानदीप’ ॲकॅडमीने विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याची मागणी महाज्योतीकडे केली. त्यानुसार आता प्रतिविद्यार्थी प्रशिक्षण शुल्क ४६ हजारांवरून १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे समजते. त्यापोटी दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे १५ ते १८ कोटी खर्च केले जाणार आहेत. राज्यातील इतर नामांकित प्रशिक्षण संस्थांचे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण शुल्क सुमारे ४५ ते ७५ हजारापर्यंत आहे.
...
काहीच माहिती नाही!
या कामात विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांनी ‘ज्ञानदीप’वर विशेष मेहेरबानी केल्याचे बोलले जाते. खेडेकर हे ‘ज्ञानदीप’ ॲकॅडमीचे महेश शिंदे यांच्या जवळचे समजले जातात. खेडेकर यांची दोन पुस्तके ॲकॅडमीनेच प्रकाशित केली आहेत. दरम्यान, यासंदर्भात ओबीसी व्हीजेएनटी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी या विषयासंदर्भात त्यांना काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
...
सर्व कायदेशीर प्रक्रिया...
ज्ञानदीप ॲकॅडमीचे महेश शिंदे म्हणाले की, संस्थेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम मिळवले आहे. संस्था कोचिंग क्लासेसच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करीत नाही. आमच्याबद्दल एकाही विद्यार्थ्याची तक्रार नाही. काही विशिष्ट लोक संस्थेची नाहक बदनामी करण्याच्या हेतूने प्रयत्न करीत आहेत.