छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक
छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक

छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पालिकेच्या धारावी परिसरातील छोटा सायन रुग्णालयात लवकरच वेलनेस क्लिनिक सुरू केले जाणार आहे. असंसर्गजन्य रोग (एनसीडी) कॉर्नरमधून आढळणाऱ्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर या वेलनेस क्लिनिकमध्ये उपचार केले जाणार आहेत. हा प्रकल्प महिन्याभरात सुरू केला जाणार आहे.
ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या असंसर्गजन्य रोग (एनसीडी) कॉर्नरवरील अनुभवाच्या आधारावर सायन रुग्णालयाने धारावीत हेल्थ आणि वेलनेस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राद्वारे स्थानिकांना अमली पदार्थांचे सेवन, जीवनशैलीत बदल आणि इतर गोष्टींसह तणाव व्यवस्थापन यावर समुपदेशन दिले जाईल.
असंसर्गजन्य रोगांची तपासणी सुरू करणारे हे रुग्णालय पालिकेचे पहिले रुग्णालय आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, तपासल्या जाणाऱ्या सर्व लोकांपैकी जवळपास २० टक्‍के लोकांना एक किंवा दोन्ही स्थिती आढळून आल्या. त्यामुळेच त्यांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या सर्वांगीण केंद्राची कल्पना सुचली आहे.
समुपदेशनाव्यतिरिक्त, केंद्रामध्ये निदान सुविधादेखील असेल ज्यातून जवळपास १५० प्रकारच्या तपासण्या केल्‍या जातील. यासह केंद्रात आवश्यक असणाऱ्या सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीनसाठीचा प्रस्ताव यापूर्वीच दिला गेला आहे. यासह योगा सेशनही येथे आयोजित केले जातील, अशी माहितीही देण्यात आली आहे.

आमच्याकडे समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्‍ज्ञ आणि इतर तज्‍ज्ञांची टीम असेल. स्थानिकांना समुपदेशनाद्वारे अमली पदार्थ आणि मादक पदार्थांचे सेवन कशाप्रकारे टाळायचे, याविषयी माहिती देतील. यासह जीवनशैली सुधारण्याचा सल्लादेखील देऊ. ज्यामुळे लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार टाळण्यास मदत होईल.
– डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

असुरक्षित लोकांपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योग्य वेळी पोहोचले नाहीत, तर त्यांच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करून आपण त्यांचा आजार गंभीर होण्यापासून किंवा आजारापूर्वीच निर्बंध लावता येऊ शकतात. यामुळे शहरातील एकूणच आजारांचा भार कमी होण्यास मदत होते.
– डॉ. सीमा बनसोडे गोखे, कम्युनिटी मेडिसिन विभागप्रमुख

एनसीडी कॉर्नरचे काम वाढवणार
सायन रुग्णालयातील पाच ठिकाणी एनसीडी कॉर्नर सुरू केले गेले आहे. जिथे दिवसाला सरासरी ३५० नागरिकांची स्क्रीनिंग केली जाते. दिवसाला किमान १००० नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यासाठी हे काम तीन पटीने वाढवण्याचे रुग्णालयाचे उद्दिष्ट आहे. स्क्रीनिंगच्या संख्येत वाढ झाल्याने आणि जीवनशैलीतील आजारांच्या सुरुवातीच्याच टप्प्यात रोखले, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह या सर्वात घातक आजारांपासून एनसीडीतर्फे प्रतिबंध आणू शकतो, असे डॉ. जोशी म्हणाले.

कर्करोगाचाही समावेश करणार
डॉ. बनसोडे-गोखे म्हणाले की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या स्थितींसाठी सुरुवातीपासून तपासणी केली जाईल; परंतु त्यानंतर कर्करोग तपासणीचा समावेश करण्याची योजना आहे. विशेषत: स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा आणि तोंडाचा कर्करोग यांसारख्या कर्करोगाच्या काही सर्वात प्राणघातक प्रकारांचा लवकर शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.