ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना
ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना

ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : ठाण्याच्या घंटाळी परिसरात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली; तर अवघ्या काही तासांतच वर्तकनगर परिसर लोकमान्य नगरमध्ये पाडा नं. ४, मामा भाच्याच्या डोंगराखाली दुसरी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेने ठाण्यात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या घंटाळी मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी तीन तरुण हे रिक्षातून आले. या वेळी त्यांनी महेश माने यांच्या सुरू असलेल्या बांधकाम साईटवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर आरोपीनी ओम साई प्रॉपर्टी ऑफिसमध्ये असलेले अश्विन गमरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये अश्विन गमरे हा जखमी झाला असून त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार त्रिकुटाने संपत्तीच्या वादातून गोळीबार केळ्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गोळीबाराचा गुन्हा अज्ञात त्रिकुटावर दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. गोळीबाराची दुसरी घटना वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्यनगर पाडा -४ येथील मामा भाच्याच्या डोंगराच्या खाली घडली. हा गोळीबार विपिन मिश्रा या आरोपीने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे; तर घंटाळी आणि वर्तकनगर गोळीबाराच्या घटनेत आरोपी तेच असावेत, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या गोळीबारात गणेश जाधव ऊर्फ काळ्या गण्या याच्या डोक्यात गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात जखमी जाधवला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे; तरी या दोन्ही गुन्ह्यांत समावेश असलेले आरोपी हे एकच आहेत. ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने आरोपी विपीन मिश्रा आणि आरोपी सौरभ शिंदे यांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट -५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.
----------
दोन महिन्यांत गोळीबाराच्या चार घटना
- ठाण्यात दोन महिन्यात तब्बल चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. सप्टेंबरमध्ये एक, तर ऑक्टोबर महिन्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. या गोळीबाराच्या घटनांमुळे ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रिक्षातून आलेल्या तिघा आरोपींनी हा गोळीबार, तोडफोड केलेली आहे. जवळच्या हॉटेल कर्मचारी यांनी हा प्रकार पाहिलेला आहे. गोळीबारात अश्विन गमरे हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांधकाम साईटच्या वादातून गोळीबार झाला, असा अंदाज आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
- संजय धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नौपाडा पोलिस ठाणे