नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : शहरात घातपाताच्या सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे १ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर या पंधरवड्यासाठी मुंबई पोलिस उपायुक्तांकडून नवीन आदेश देण्यात आले आहेत.

नोव्हेंबरमधील पहिल्या पंधरवड्यात पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येणे, बेकायदा मिरवणुका, लाऊड ​​स्पीकर, बॅण्डचा वापर करण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. पोलिस कायद्यातील तरतुदींनुसार जारी करण्यात आलेल्या आदेशात, या काळात होणारे विवाहसोहळे, अंत्यविधी, क्लबमधील कार्यक्रम, कंपन्यांमधील कार्यक्रम, सहकारी संस्था, चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉलमधील सभांना सूट देण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक सुरक्षा किंवा सरकारविरोधात कट करणारी चित्रे, चिन्हे आणि फलकांची निर्मिती, प्रदर्शन आणि प्रकाशन यावरही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशानुसार या काळात प्रक्षोभक उच्चार, गाणी आणि संगीताचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.