ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना
ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना

ठाण्यात गोळीबारच्या दोन घटना

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : ठाण्याच्या घंटाळी परिसरात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली; तर अवघ्या काही तासांतच वर्तकनगर परिसर लोकमान्य नगरमध्ये पाडा नं. ४, मामा भाच्याच्या डोंगराखाली दुसरी गोळीबाराची घटना घडली. घंटाळी परिसरात पहाटे झालेल्या गोळीबारप्रकरणी आणि वर्तकनगरमधील हत्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ आणि नौपाडा पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या कारवाईत प्रत्येकी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले.
घंटाळी मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी तीन तरुण हे रिक्षातून आले. या वेळी त्यांनी महेश माने यांच्या सुरू असलेल्या बांधकाम साईटवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर आरोपींनी ओम साई प्रॉपर्टी ऑफिसमध्ये असलेले अश्विन गमरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये अश्विन गमरे हा जखमी झाला असून त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा घंटाळीत गोळीबार माने यांच्या सुरू असलेल्या प्रकल्पात प्रोटेक्शन मनी मिळावा म्हणून करण्यात आला. दुसरी गोळीबाराची घटना वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्यनगर पाडा -४ येथील मामा भाच्याच्या डोंगराच्या खाली घडली. हा गोळीबार विपिन मिश्रा याने केला. यामध्ये गणेश जाधव ऊर्फ काळ्या गण्या याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत गणेश जाधव आणि आरोपी विपिन मिश्रा दोघेही जेलमध्ये मित्र होते. दरम्यान एका गुन्ह्यात गणेश जाधवला जामीन मंजूर झाला आणि तो कारागृहाच्या बाहेर पडला. जेलमध्ये विपिनला काळ्या गण्याने शब्द दिला होता. मी बाहेर पडताच तुला बाहेर काढतो. मात्र गणेशने विपिन मिश्राला जेलबाहेर काढण्याचा शब्द पूर्ण केला नाही. याच राग मनात धरून विपिनने गणेशवर गोळीबार करून तेथून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.


दरम्यान पोलिस पथकाने अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक केली. आरोपीचे हे कृत्य सीसी टीव्हीमध्ये कैद झाले; मात्र स्पष्ट चित्रण नसल्याने बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली. गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलिस पथकाने सापळा रचून आरोपी विपिन मिश्रा, सौरभ शिंदे या दोघांना मुलुंड परिसरातून अटक केली; तर नौपाडा पोलिसांच्या पथकाने आरोपी सूरज मेहरा ऊर्फ थापा याला वाशी येथून; तर आरोपी रिक्षावाला शशिकांत राजाराम व्हटकर याला पनवेलमधून अटक केली.


तपासासाठी नऊ पथके
-------
या गोळीबाराच्या घटनेतील आरोपींना पकडणे ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न निर्माण झाला. नौपाडा पोलिस, वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक अशी ९ पोलिस पथके बनवून पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले. यात गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने दोघांना; तर नौपाडा पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक करून संयुक्त कारवाई यशस्वी केली.

दोन महिन्यांत गोळीबाराच्या चार घटना
- ठाण्यात दोन महिन्यांत तब्बल चार गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. सप्टेंबरमध्ये एक, तर ऑक्टोबर महिन्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. या गोळीबाराच्या घटनांमुळे ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.