वरई-पारगाव रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरई-पारगाव रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता
वरई-पारगाव रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता

वरई-पारगाव रस्त्यावर खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता

sakal_logo
By

मनोर, ता. २२ (बातमीदार) : वरई-पारगाव रस्त्यावर नगावे गावच्या हद्दीत भगदाड पडल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. खबरदारी म्हणून भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या लावण्यात आल्या आहेत. भगदाड पडलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोका दर्शवणारा फलक लावण्यात आला नसल्याने अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर पडलेले भगदाड तात्काळ बुजवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
वर्षभरापूर्वी वरई-पारगाव रस्त्यावर नावझे गावच्या हद्दीत जी. आर. कंपनीच्या कॅम्पसमोरच्या उतारावर खड्डा पडला होता. वरई-पारगाव रस्त्यामार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि सफाळे रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. त्यामुळे वसई-विरार आणि मुंबईकडे जाणारे चाकरमानी या रस्त्याचा वापर मोठ्या संख्येने करतात. सफाळे पूर्वेकडील गावांमधील शेतमालाच्या विक्रीसाठी सफाळे बाजारपेठेत जाणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सफाळे बाजारपेठेत खरेदीला जाणारे ग्राहक या रस्त्याचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू झाल्याने जीआर कंपनीच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे.
अपघाताची शक्यता असल्याने दोन आठवड्यांपूर्वी मातीचा वापर करून येथील भगदाड बुजवण्यात आले होते; परंतु अवजड वाहतुकीमुळे रस्त्याखालचा सिमेंट पाईप फुटून पुन्हा मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्याच्या ठिकाणी धोका दर्शवणारा फलक नसल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने खड्डा बुजवण्याची मागणी दुचाकीस्वार आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

.................................
नगावे येथे पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डा बुजवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपघात रोखण्यासाठी खड्डा बुजवणे गरजेचे आहे.
- रणजित ठाकूर, उपसरपंच, नावझे.

...............................
नगावे हद्दीतील खड्डा बुजवण्यात आला होता. या रस्त्यावर मुंबई-बडोदरा एक्स्प्रेसवेच्या कामाच्या अवजड वाहनांमुळे पुन्हा खड्डा पडला आहे, लवकरच बुजवण्यात येईल.
- अरुण चौधरी, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग