दिवाळीच्या सजावटीत विद्युत दिव्यांच्या माळांची चलती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या सजावटीत विद्युत दिव्यांच्या माळांची चलती
दिवाळीच्या सजावटीत विद्युत दिव्यांच्या माळांची चलती

दिवाळीच्या सजावटीत विद्युत दिव्यांच्या माळांची चलती

sakal_logo
By

भारती बारस्कर
शिवडी, ता. २२ (बातमीदार) ः दिवाळीत घराची सजावट करताना विद्युत रोषणाईदेखील अनेक ठिकाणी करण्यात येते. यामुळे सजावट अधिकच उजळून निघते. विद्युत रोषणाईच्या माळा सजावटीचा मुख्य भाग झाल्याने विद्युत माळांना मोठी मागणी बाजारपेठेत आहे. दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली असली, तरी मुंबईतील दादर, मस्जिद बंदर व क्रॉफर्ड बाजारपेठेत एलईडी माळांसह चायना बनावटीच्या माळांना मोठी मागणी दिसून येत आहे. भारतीय बनावटीबरोबरच चायना बनावटीच्या रोषणाईच्या माळांचाच झगमगाट बाजारात दिसून येत आहे. लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळांच्या विविधतेत भर पडली असून, फुलात, फळात आणि आकर्षक आकारांतील प्रकाशमान दिवे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दिवाळीसाठी बाजारपेठेत अजूनही नागरिकांची खरेदीची लगबग सुरू आहे. घर सजावटीसाठीच्या वस्तूंमध्ये आकाश कंदील, रांगोळी, पणत्या, लटकन, सोनेरी पट्ट्या, मोत्यांच्या माळा, इलेक्ट्रिक वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, प्लास्टिक फुलांच्या आकर्षक माळांना मागणी आहे. दिसायला आकर्षक व किंमतही कमी असलेल्या चायना मेड लायटिंगच्या माळांनाही ग्राहक पसंती देत आहेत.

आकारानुसार किमती
विविध आकर्षक रंग व डिझाईनमध्ये विद्युत माळा उपलब्ध आहेत. या माळा ५० फुटांपासून ते १०० फूट लांबीच्या आहेत. या माळांची १०० ते ७०० रुपये किंमत असून आकारानुसार किंमती ठरलेल्या आहेत. विशेष म्हणजे वीज वापर कमी होणाऱ्या दिवे खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. दिवाळीला विविध प्रकारच्या विजेच्या माळा, कृत्रिम फुले, एलईडीची तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. विजेच्या माळामध्ये रंगीबेरंगी थ्रीडी व मेटलचे बॉल विक्रीला आहेत. याच्या किमती ४०० रुपयांपासून पुढे आहेत. त्याचबरोबर डिझायनर लायटिंगमध्ये स्टार, गोलाकार, बदाम असे विविध आकार मेटलमध्ये आहेत. काही माळांमध्ये मेटलचे दिवे लावले आहेत. या माळांची किमती बल्बच्या किमतीनुसार आहेत. आपल्या सोयीनुसार भिंतीवर सोडता येतील, अशा माळांचे प्रकार आहेत. ज्या उष्णतेमुळे वितळणार नाहीत, अशा माळांच्या किमती ३०० रुपयांपासून पुढे आहेत, असे विक्रेते प्रकाश रोकडे यांनी सांगितले.

मेड ईन चायनाला पसंती
चायना माळा आकर्षक व किंमत कमी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चायनीज माल खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. भारतीय बनावटी वस्तू दिसायला आकर्षक नाही; परंतु मजबूत असल्यामुळे चायना वस्तूपेक्षा दराने जास्त आहेत. त्यामुळे या वस्तू खरेदीकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल कमी दिसून येत आहे. यंदा डिझायनर लायटिंगची मागणी अधिक आहे. रंग बदलणारी व डीम होणारी लायटिंग तर बाजारात आहेच; पण रिमोट कंट्रोल तसेच मोबाईल व लॅपटॉपवरून नियंत्रित होणारी लायटिंगही आहे. वीज वाचवणारी लायटिंग उपलब्ध आहेत. त्यामुळे विजेचा वापरही कमी होतो, असे दुकानदार रवींद्र शिंगे यांनी सांगितले.