ठाण्यात रुग्णवाहिकेवर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रुग्णवाहिकेवर दगडफेक
ठाण्यात रुग्णवाहिकेवर दगडफेक

ठाण्यात रुग्णवाहिकेवर दगडफेक

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (वार्ताहर) : शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर येथील गोळीबारात जखमी गणेश जाधव ऊर्फ काळ्या गण्या याला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आला. या ठिकाणी जमलेल्या गणेश ऊर्फ काळ्या गण्याच्या समर्थकांनी मृतदेह आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत रुग्णवाहिकेवरच दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली.

शुक्रवारी रात्री वेदांत रुग्णालयात गोळीबारात जखमी गणेश जाधव ऊर्फ काळ्या गण्या याचा उचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर मृतदेह हा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला; मात्र गोळीबाराचा प्रकार असल्याने हे शवविच्छेदन हे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात करावे लागणार असल्याची माहिती मृत गणेश याच्या समर्थकांना मिळाली. या वेळी २०० जणांचा घोळका सिव्हिल रुग्णालय परिसरात जमला. मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून चार पोलिस मुंबईकडे निघाले असतानाच मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर जमावाने दगडफेक केली. यामुळे ही रुग्णवाहिका थेट वर्तकनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने मृतदेह नेण्यास नकार दिला. या वेळी वर्तकनगर पोलिसांनी दुसऱ्या रुग्णवाहिकेतून मृतदेह जे. जे. रुग्णालयात नेला. या घडलेल्या प्रकाराबाबत ठाणे नगर पोलिस ठाण्यात नोंद केली की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.