तोतया लष्करी अधिकारी बनून लाखोंचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया लष्करी अधिकारी बनून लाखोंचा गंडा
तोतया लष्करी अधिकारी बनून लाखोंचा गंडा

तोतया लष्करी अधिकारी बनून लाखोंचा गंडा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईत सायबर घोटाळेबाजाने भारतीय लष्कराचा अधिकारी असल्याची ओळख सांगत महिलेला लाखोंचा गंडा घातला असल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्र व आधार कार्ड बनवून आणि लष्कराचा गणवेश परिधान करून एका महिलेचे घर भाड्याने घेण्याच्या निमित्ताने ३.६८ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अंधेरी येथील तक्रारदार महिलेने दक्षिण मुंबईतील फ्लॅट भाड्याने देण्यासाठी काही प्रॉपर्टी संकेतस्थळावर जाहिरात दिली होती. १४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीनारायण अशी ओळख सांगत आरोपीने तिला फोन करून घर भाड्याने घेण्यात स्वारस्य दाखवले. आरोपीने तिला सांगितले की, तो भारतीय सैन्यात अधिकारी असून त्याला मुंबईत घर भाड्याने हवे आहे. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने भारतीय लष्कराचे ओळखपत्र, आधार कार्ड आणि आर्मी कॅन्टीन कार्डची छायाचित्रे पाठवली. आरोपीने महिलेला सांगितले की, आपण २८ हजार रुपये पाठवले; परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते हस्तांतरित होत नाहीत. त्यानंतर त्याने महिलेला लष्कराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून काही पैसे पाठवण्यास सांगितले आणि दुप्पट रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. महिलेने सुरुवातीस नकार दिला; पण वेगवेगळ्या प्रकारे आरोपीने तिला प्रलोभन दाखवून तिला एकूण ३.६८ लाख रुपये देण्यास भाग पाडले.