अलिबाग-वडखळ दुपदरीकरणाला मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग-वडखळ दुपदरीकरणाला मंजुरी
अलिबाग-वडखळ दुपदरीकरणाला मंजुरी

अलिबाग-वडखळ दुपदरीकरणाला मंजुरी

sakal_logo
By

अलिबाग, ता. २३ (बातमीदार)ः खड्डेमय व अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांमुळे अलिबाग - वडखळ प्रवास नकोसा झाला आहे. मात्र आता याच मार्गावरून अवघ्या काही मिनिटातच वडखळला पोचता येणार आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या अलिबाग ते वडखळ हा रस्ता दुपदरी करण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता अलिबाग ते वडखळचा प्रवास सुपर फास्ट होणार आहे.
अलिबाग ते वडखळ या २२.२ कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०२२-२०२३ अंतर्गत दुपदरीकरण करण्यात येणार असून काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ७ जून २०२२ रोजी आमदार जयंत पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले होते.
मुंबई, ठाण्यापासून जवळ असलेल्‍या अलिबाग पर्यटन स्थळावर वर्षभर लाखो पर्यटकांची रेलचल असते. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचेही हाल होत आहेत. अलिबागच्या विकासाचा आणि स्थानिक व पर्यटकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून अलिबाग ते वडखळ हा रस्ता दुपदरी करावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती .


खंडाळा येथे पूल उभारण्याचा विचार
अलिबाग-खंडाळा मार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी खंडाळा येथे पूल उभारण्याचा विचार केला जात आहे. पूल उभारला गेला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.