मातीच्या किल्याची जागा घेतली काँक्रिट किल्याने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीच्या किल्याची जागा घेतली काँक्रिट किल्याने
मातीच्या किल्याची जागा घेतली काँक्रिट किल्याने

मातीच्या किल्याची जागा घेतली काँक्रिट किल्याने

sakal_logo
By

घणसोली, ता. २३ (बातमीदार) ः दिवाळी म्हटले की फराळ, प्रकाशाची उधळण, नवनवीन वस्तू खरेदी करणे; मात्र दिवाळीत जेवढे महत्त्व या गोष्टींना आहे, तेवढेच महत्त्व आहे किल्ले बनवण्याला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत किल्ले बनवण्यासाठी सर्व जण उत्सुक असतात. पूर्वी मातीचे किल्ले सर्रास बनवले जायचे. आयते किल्ले ही संकल्पना नव्हतीच; मात्र आता जसा काळ बदलला आहे तसे मातीच्या किल्ल्यांची संकल्पना आणि परंपरेची जागा घेतलीय रेडिमेड किल्ल्यांनी. यंदा सर्वत्र रेडिमेड किल्ल्यांची चलती पाहायला मिळत आहे.

दिवाळी आणि मातीचे किल्ले यांचे नाते अनेक वर्षांपासून आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागताच दगड, माती गोळा करून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, किल्ले बनवले जात. किल्ल्यासमोर रांगोळी काढली जात असे, पण आता असे खेळ खेळणारी पिढी दिसेनाशी झाली आहे. मातीचे किल्ले बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय, त्याची जागा आता रेडिमेड किल्ल्यांनी घेतली आहे. किल्ले बनवायला जी मेहनत लागत असे, ती आता संपली आहे. त्यामुळे एका सर्जनशील आनंदापासून आजची पिढी मुकली आहे असेच म्हणावे लागेल.

दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. पूर्वी शहरीकरणाचा प्रभाव कमी असल्याने माती मुबलक प्रमाणात उपलब्ध होती, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे, लोकवस्तीमुळे मातीऐवजी सर्वत्र काँक्रीट दिसू लागले आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे मातीचे किल्ले बनवून दिवाळी साजरी करण्याकडे लहान मुलांनी पाठ फिरवली आहे. आता रेडिमेड किल्ल्यांना ग्राहकांनीही चांगलीच पसंती दिली आहे; मात्र स्वतःच्या हाताने किल्ले बनवून इतरांकडून जे कौतुक बच्चेकंपनीला मिळायचे ते आता दिसत नाही. ज्याप्रमाणे मैदानी खेळाची जागा आता स्मार्ट फोन्सने घेतलीय, त्याप्रमाणे आपले जुने खेळ आणि करमणुकीची साधनेही कुठे तरी लुप्त होत चालली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात किल्ले कमीच पाहायला मिळाले. यंदा किल्ले दिसत आहेत, पण ते काँक्रीटचे. पूर्वी किल्ले शेण, लाल माती, धान्याचे पिठ यांपासून बनवले जायचे. आजच्या युगात मातीचे किल्ले बनवणे शक्य होत नसल्याने पालक चिमुरड्यांना रेडिमेड किल्ले देणे पसंत करत आहेत. रेडिमेड किल्ल्यांसोबत मावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृतीदेखील उपलब्ध असल्याचे दिसून येते.
----
स्पर्धांमध्येच परंपरा शिल्लक
अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. परंपरा टिकून राहावी यासाठी काही सामाजिक, इतिहासप्रेमी संस्था किल्ले बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करत असतात. यात फक्त मातीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून किल्ला तयार करायला सांगितले जाते. यामुळे बक्षिसाच्या अपेक्षेने का असेना, लहान मुले किल्ले बनवायला तयार होतात. माती, दगड, गोळा करायला मुलांचे घोळके निघतात. किल्ला तयार करताना मातीचे लिंपण करणे ही सर्व कामे ते स्वतः करतात.
-----
मुलांकडे वेळेची कमतरता
आताच्या मुलांना वेळ मिळत नाही. अभ्यास आणि इतर क्लासेसमध्ये त्यांचा सर्व वेळ खर्च होतो. त्यातच जागेचा आभाव आणि विशेष म्हणजे बरीच मुले स्मार्ट फोनच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे कमी वेळात आणि कमी जागेत बसत असल्याने पीओपीच्या किल्ल्यांना मागणी वाढली आहे. हे किल्ले तर काँक्रीटचे असतात; मात्र यांच्यावरील मावळे तेवढे मातीचे राहिले आहेत. त्यामुळे आपल्या रुढी परंपरा मुलांना अवगत राहाव्यात यासाठी पालकांनीदेखील एक पाऊल उचलणे गरजेचे आहे.
------
पूर्वी दिवाळी म्हटले की किल्ले हे एक विशेष आकर्षण असायचे. कारण ते आपण स्वतःच्या मेहनतीने बनवायचो; मात्र ही परंपरा मुलांना आता फारशी आवडत नाही. मुले त्यात जास्त रुची दाखवत नाहीत. यामुळे आपल्या परंपरा कुठे तरी लुप्त होत चालल्या आहेत.
- मंगल आसावले, पालक