ई-नाम प्रशिक्षणाकडे व्यापाऱ्यांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-नाम प्रशिक्षणाकडे व्यापाऱ्यांची पाठ
ई-नाम प्रशिक्षणाकडे व्यापाऱ्यांची पाठ

ई-नाम प्रशिक्षणाकडे व्यापाऱ्यांची पाठ

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः ऑनलाईन बाजाराच्या स्पर्धेत बाजार समित्यांनाही टिकून राहता यावे, यासाठी पणन मंडळ आणि केंद्र सरकारच्या वतीने ई-नाम प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न पाच वर्षांपासून केला जात आहे. अनेक प्रयत्न करूनही बाजार समित्यांमध्ये हा प्रकल्प अद्याप यशस्वी होऊ शकलेला नाही. त्यामुळे मुंबई बाजार समितीमधून ई-नाम जवळजवळ हद्दपार झाले आहे. मात्र आता पुन्हा हा प्रकल्प राबवण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी नुकतेच व्यापाऱ्यांसाठी ऑनलाईन ई-नाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाकडेही व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील सर्व बाजार समित्या एकत्र जोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने माल विकता यावा, यासाठी ई-नाम प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र या ई-नाम प्रक्रियेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला आहे. ई-नाम अंतर्गत व्यापार करणे या बाजार आवारात शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मन वळविण्यासाठी कृषी विभाग, कृषी पणन मंडळ, बाजार समिती यांच्या वतीने वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच अंतर्गत बाजार समितीमधील व्यापाऱ्यांसाठी नुकतेच ऑनलाईन ई-नाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पणन मंडळाच्या वतीने व्यापाऱ्यांना लिंक पाठवण्यात आली होती. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा माल अधिक येत असल्याने येथे ई-नाम प्रक्रियेने व्यापार करणे शक्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराकडे बहुतांश व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यात ११ ते साडेबारा ही व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची वेळ असल्याने या वेळेत व्यापार सोडून प्रशिक्षण शिबिराला कोण जाणार, असा प्रश्न काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
ई-नाम पद्धती दैनंदिन व्यापारात वापरता यावी, यासाठी ई-लिलाव गृह आणि ई-प्रयोगशाळाही बाजार आवारात सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत मुंबई बाजार समितीमध्ये माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची प्रतवारी करता येणार आहे आणि ई-लिलाव पद्धतीने तो विकता येणार होता. मात्र या पद्धतीचा वापरच न झाल्याने अखेर हे ई-लिलाव गृह आणि ई-प्रयोगशाळा बंद करण्यात आली आहे.
ई-नाम अंतर्गत व्यापार सुरू झाल्यावर तिथल्या तिथे शेतकऱ्यांना त्यांच्या विकलेल्या मालाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. शेतकऱ्याने बाजार समितीत आणलेला माल ई-लिलावगृहात ऑनलाईन पद्धतीने देशभरात कुठेही विकता येणार आहे. तसेच या प्रक्रियेत व्यापाऱ्यांना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आम्हाला प्रशिक्षण घेऊन काय फायदा, असे काहींचे म्हणणे आहे.


‘ई- नाममध्ये सर्व व्यवहार रोख होणार आहेत. उधारीवर नाहीत. त्यामुळे ज्याच्याकडे रोख पैसे आहेत, तोच यात सहभागी होऊ होऊ शकतो. बाजारात प्रत्यक्षात निम्मे व्यवहार उधारीवर होतात. तसेच शेतकरी आणि ग्राहक यांनाच ही पद्धती वापरण्याची परवानगी आहे. त्यामुळे व्यापारी, अडते यांचे काय काम राहिले? त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करण्यास आणि प्रशिक्षण घेण्यास व्यापारी तयार होत नाहीत.
- संजय पानसरे, संचालक फळबाजार