लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट
लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट

लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ८०० कोटी रुपये महसूल प्राप्त होईल, असा अंदाज तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला होता. लिडार सर्वेक्षणातून २०० कोटी रुपयांची भर पालिकेच्या तिजोरीत पडणार होती, पण लिडार सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मालमत्ता देयक हे मालमत्ता करधारकांना पाठवण्यात आले नाही. त्यामुळे यंदाच्या करातून पालिकेच्या उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लिडार सर्वेक्षणाव्यतिरिक्त मालमत्ता करातून ठेवलेले टार्गेट गाठण्यात पालिकेला यश मिळेल, असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले आहे.

सन २०२१-२२ मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या पाहिल्या सहामाहीत पालिकेने १९५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला होता. दरम्यान, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये २२० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे पालिकेने लिडार सर्वेक्षणाव्यतिरिक्त असणाऱ्या मालमत्ता करातून ६०० कोटींचे टार्गेट ठेवले असून ते गाठण्यात पालिकेला यश मिळेल असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने नवी मुंबई पालिकेला सर्व मालमत्तेची मोजदाद करण्यासाठी लिडार सर्वेक्षणाला अनुमती दिली असून ते काम अंतिम टप्प्यात आहे. पालिकेच्या मालमत्ता कराच्या संकलनानुसार सव्वातीन लाख मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लिडार सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर या संख्येत आणखी दीड लाखांची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पालिकेचा लिडार सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर २०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वाढणार आहे, पण सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये लिडार सर्वेक्षणाचे काम पूर्ण न झाल्यामुळे या वर्षात ठरलेले टार्गेट पूर्ण होणार नाही, पण सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पालिकेचे असणारे हे टार्गेट पूर्ण होणार असून यातून पालिकेच्या तिजोरीत २०० कोटी रुपयांची भर पडणार आहे.
----
अभय योजना सुरू करण्याची मागणी
नवी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी थकीत मालमत्ता कर धारकांसाठी अभय योजना सुरू करण्यात येते. यामध्ये करांमध्ये सूट देण्यात येत असल्यामुळे अनेक थकीत मालमत्ता करधारक हे आपले मालमत्ता कर भरतात, पण पालिकेने आजतागायत अभय योजना लागू न केल्यामुळे अनेक थकीत असणारे मालमत्ता करधारक हे हवालदिल झाले आहेत. मालमत्ता करधारकांसाठी अभय योजना लागू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
----
लिडार सर्वेक्षणाचे काम सुरू असून पुढील आर्थिक वर्षात नवीन मालमत्ता करधारकांना देयक पाठवण्यात येतील; तर गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत पहिल्या सहामाहीत पालिकेने जास्त मालमत्ता करांतून जास्त महसूल प्राप्त केला आहे. त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत झालेले टार्गेट पालिका पूर्ण करेल.
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त