कुत्र्यांचे निर्बीजीकरण मंदावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्र्यांचे निर्बीजीकरण मंदावले
कुत्र्यांचे निर्बीजीकरण मंदावले

कुत्र्यांचे निर्बीजीकरण मंदावले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच मागील तीन ते चार वर्षांपासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची बंद असलेली प्रक्रिया मार्च २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे; मात्र मागील आठ महिन्यांत केवळ एक हजार ९५८ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. एकीकडे कुत्र्यांचे जास्तीत जास्त संख्येत निर्बीजीकरण होणे अपेक्षित असताना, जागेअभावी निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेची गती मंदावली असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहरतील विविध भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरत आहे. त्यातच ठाणे पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक व्‍यक्‍ती जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची नसबंदी केली जाते. त्याचे कंत्राट महापालिकेने खासगी कंत्राटी कंपनीला दिले होते. महापालिका क्षेत्रात २००४ ते २०१९ पर्यंत आठ कोटी रुपये खर्च करून ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नगरसेवकांचा विरोध
ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या महासभेपूर्वी प्रशासनाने या कामासाठी एक कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावर नगरसेवकांनी नसबंदी शस्त्रक्रियेला आक्षेप घेत हा प्रस्ताव मंजूर केला नाही. यानंतर नवीन निविदा काढण्यासाठी आणलेल्या प्रस्तावाला महासभेने मंजुरीदेखील दिली नाही. अशा स्थितीत कुत्र्यांची नसबंदी पुन्हा सुरू होऊ शकली नाही. या मोहिमेसाठी ठाणे पालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार एक कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या पैशातून एकूण ९ हजार कुत्र्यांच्या नसबंदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. ठाणे महापालिका हद्दीतील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचे २०१८ पासून निर्बीजीकरण प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याचे समोर आले.

नवीन निविदा मंजूर
निर्बीजीकरण प्रक्रियेबाबत २०२१ मध्ये नवीन निविदा काढण्यात आली असून त्याची वर्क ऑर्डरदेखील देण्यात आली आहे. त्यानुसार मार्च २०२२ पासून पुन्हा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्‍यानुसार ठाणे महापालिका हद्दीत मागील आठ महिन्यांत केवळ एक हजार ९५८ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी दिली. अशातच एकीकडे कुत्र्यांचे जास्तीत जास्त संख्येत निर्बीजीकरण होणे अपेक्षित असताना, जागेअभावी निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेची गती मंदावली असल्याचे दिसून येत आहे.