झेंडूची फुले, पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडूची फुले, पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी झुंबड
झेंडूची फुले, पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी झुंबड

झेंडूची फुले, पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी झुंबड

sakal_logo
By

अलिबाग, ता. २३ (बातमीदार)ः नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी सोमवारी (ता.२४) आल्‍याने बाजारात खरेदीला उधाण आले आहे. पूजा साहित्‍याबरोबरच झेंडूची फुलांची मोठी मागणी आहे. नाक्यानाक्यावर फुले विक्रीची दुकाने सजली आहेत. याशिवाय व्यापाऱ्यांकडून चोपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.
नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्यानंतर नवनवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे, फराळाचा आनंद घेऊन दिवाळी साजरी केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोपडी पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी दिव्यांचा झगमगाट असतो. त्यामुळे या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अलिबागसह अनेक बाजारात झेंडूची फुले, चोपडीसह वेगवेगळे पूजेचे साहित्य दाखल झाले आहेत.
विविध प्रकारचे कपडे, फराळाचे पदार्थ, वस्तूंनी बाजारपेठ सजल्या आहेत; मात्र रोज सायंकाळी बरसणाऱ्या पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर काहीसे विरजण पडत आहे.
खरेदीसाठी रविवारी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्‍याने शहरातील मुख्य रस्‍ते, बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडीची समस्‍या उद्‌भवली.

दिवाळीसाठी कापड उद्योगात मोठी उलाढाल असते. सध्या तयार कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्‍या, रांगोळ्यांनी बाजारपेठा सजल्‍या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मोबाईल, टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमसमोर खास मंडप उभारून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास सवलत जाहीर करण्यात आल्‍या आहेत.