अपघातग्रस्त बसचा चालक मद्यधुंद? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातग्रस्त बसचा चालक मद्यधुंद?
अपघातग्रस्त बसचा चालक मद्यधुंद?

अपघातग्रस्त बसचा चालक मद्यधुंद?

sakal_logo
By

पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : ठाणे - विटा या एसटी बसला शनिवारी (ता. २२) अपघात झाला होता. मद्यधुंद चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातातील जखमी एसटी बसचालक कुशाल बाबाराम चव्हाण (वय ३५) हा शनिवारी (ता. २२) सकाळी ठाण्याहून विटा येथे जाणारी एसटी बस घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत गौतम कांबळे हा वाहक होता. बस सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील कोन पुलावरून डाव्या बाजूला वळताना दुभाजकावर धडकली. तिथून २०० मीटर फरपटत जाऊन ही बस एका झाडावर जाऊन आदळली. वळणावर वेग कमी करण्याऐवजी चालकाने ८०-९० च्या वेगाने बस चालवली, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. या अपघातात चालकासह बसमधील ६ प्रावासी जखमी झाले. चालक कुशाल चव्हाण हा सकाळीच दारू पिऊन एसटी बसवर आल्याचे; तसेच त्यानंतर पनवेल आगारात बस थांबवून त्याने पुन्हा दारू प्यायल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. १५ ते २० मिनिटानंतरदेखील चालक बसवर न आल्याने संतप्त प्रवाशांनी पनवेल नियंत्रकांकडे तक्रार केल्यानंतर चालकाने बस सुरू केली. चालक मद्य पिऊन बस चालवत असल्याची कल्पना असतानादेखील वाहक गौतम कांबळे याने याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली नसल्याचे सांगितले जात आहे.
-----------
रक्ताचे नमुने तपासणीला
बसच्या चालकाला डबल ड्युटी देण्यात आल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे; मात्र चालक कुशाल चव्हाण हा २० दिवसांच्या रजेनंतर कामावर हजर झाल्याचे अधिकारी विक्रम गायकवाड यांनी सांगिलते. चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरत त्याने मद्य घेतले होते की नाही, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.