झेंडू वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू वधारला
झेंडू वधारला

झेंडू वधारला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २३ : परतीच्या पावसाने ग्रामीण महाराष्ट्राला झोडपून काढल्याचा परिणाम फुलांच्या बाजारपेठांवर झाला आहे. पावसामुळे शेतातील भात पिकांना आणि झेंडू फुलालाही मोठा फटका बसल्याने बाजार आवक घटली आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर चांगल्या दर्जाचा झेंडू १५० रुपये किलो, तर दरवाजावरच्या तोरणाने २५० ते ३५० रुपयांचा आकडा गाठला आहे.
लक्ष्मीपूजन तसेच बलिप्रतिपदेच्या दिवशी दारावर झेंडूचे तोरण आणि आंब्याच्या पानांसोबत रोवलेली भाताची रोपे असणारे तोरण लावले जाते. मात्र परतीच्या पावसामुळे शेतातून भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत बाजारात नाशिक जिल्ह्याऐवजी पुणे जिल्ह्यातून झेंडूची आवक होत आहे. पावसामुळे झेंडू खराब झाला आहे, तर पिवळ्या रंगाच्या मोठ्या आकाराच्या झेंडूची आवकही कमी आहे. पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या तुलनेत केशरी रंगाच्या लहान आकाराच्या झेंडूला ग्राहकांची मागणी अधिक असल्यामुळे हा झेंडू तब्बल १५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. झेंडूसोबत भाताची रोपे असणाऱ्या तोरणांचा आकडाही ३५० रुपयांच्या पुढे गेला आहे.

झेंडूची पुणे जिल्ह्यावर मदार
परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपल्याने बहुतांश पॉली हाऊसमधील झेंडूची फुले खराब झाली. त्यामुळे वाशीच्या बाजारात पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, खेड, मंचर, घोडेगाव, नारायणगाव, कडूस आणि तासकमान आदी भागांतून झेंडू बाजारात दाखल झाला आहे. यातही काही माल खराब झाल्यामुळे बाजारात मोठ्या आकारापेक्षा लहान आकाराचा केशरी रंगाच्या झेंडूची आवाक कमी झाली आहे.

केशरी झेंडूला मागणी
सजावट अथवा फुलांचा हार तयार करण्यासाठी केशरी रंगाच्या लहान आकाराच्या झेंडूला अधिक पसंती असते. केशरी रंगाचा लहान आकाराचा झेंडू अधिक काळ टिकतो. तसेच तो सुकल्यानंतरही त्याचा रंग बराच काळ बदलत नाही. त्याउलट मोठ्या आकाराचा झेंडू लगेच खराब होतो.

पावसामुळे झेंडू खराब झाला. उरलेला झेंडू आणि पावसापासून काहीसा वाचलेला झेंडू बाजारात विक्रीस आणला आहे. ९९ टक्के झेंडू खराब झाला आहे. त्यामुळे तो १५० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
- शंकर टोके, झेंडू व्यापारी, वाशी