कुत्र्यांचा बंदोबस्त करताना अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुत्र्यांचा बंदोबस्त करताना अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
कुत्र्यांचा बंदोबस्त करताना अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

कुत्र्यांचा बंदोबस्त करताना अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होण्यात अडथळे आणणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी कांदिवलीचे (पू.) भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्यात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. या निर्देशाची तात्काळ अंमलबजावणी करून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम तीव्र करावी, अशा मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी आयुक्तांना पाठवले आहे.
भटक्या कुत्र्यांना स्वत:च्या घराशिवाय इतरत्र कोठेही खाद्य पुरवले जाऊ नये, तसे झाल्यास दंड आकारण्याची मुभा न्यायालयाने प्रशासनाला दिली आहे. कोणत्याही नियमाने किंवा न्यायालयीन निवाड्याने भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणतेही बंधन नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे भातखळकर यांनी सांगितले आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून लहान मुले, महिला, वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. आता तर न्यायालयानेच त्यांना या कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले असल्याने कारवाईत अडथळा येणार नाही. त्यामुळे महापालिकेने कुत्र्यांवर कारवाई करावी, असेही भातखळकर म्हणाले.