मुख्यमंत्र्याचे ठाणे असुरक्षित ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्याचे ठाणे असुरक्षित ?
मुख्यमंत्र्याचे ठाणे असुरक्षित ?

मुख्यमंत्र्याचे ठाणे असुरक्षित ?

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) : ठाण्यात सुरू असलेली विकासकामे, झपाट्याने वाढणारी गृहसंकुले यामुळे ठाण्यात गुन्हेगारांनी पोळेमुळे रोवली जात आहेत. त्यामुळे ठाण्यात विनयभंग, खंडणी, धमक्या, हत्या, गोळीबारसारख्या घटना वारंवार घडताहेत; तर दुसरीकडे सोनसाखळी चोरी, फसवणूक, हाणामारी, दहशत माजवणे यासारखे गुन्हे हे नित्याचेच झाले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराच्या घटना आणि लागोपाठ झालेल्या विनयभंगाच्या घटनांमुळे ठाण्यात सर्वसामान्यांसह महिलाही असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाण्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे मुख्यमंत्र्यांचे ठाणे असुरक्षित झाले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खरे तर ठाणे हे संस्कृतीचे शहर असे असताना ठाण्याचा झपाट्याने होणारा विकास, गगनचुंबी इमारती, यामुळे गुन्हेगारांनी या ठिकाणी आपली पोळेमुळे खोलवर रुजवलेली आहेत. त्यातच या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याने हे गुन्हेगार गुन्हे करून सुटतात. त्यातच ठाणे पोलिसांचादेखील आपला एक इतिहास आहे. गुन्हा करून गुन्हेगार जास्त काळ पोलिसांच्या तावडीतून बचावू शकत नाही, अशी परिस्थिती असली तरी गुन्हेगारांवर मात्र कायद्याचा आणि पोलिसांचा अंकुश नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ठाण्यात यापूर्वीही तरुणींच्या विनयभंगाची प्रकरण घडली आहेत.

गुन्हेगारांना चाप लावण्यात पोलिसांना अपयश
--------------------
ठाणे पोलिसांचे गुन्ह्याचे तपास कौशल्य उत्कृष्ट आहे, पण फोफावणाऱ्या गुन्हेगारांना चाप लावण्यात ठाणे पोलिस हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ठाण्यात वांरवार गुन्हे घडतात. दुसरीकडे गुन्हेगाराने कायद्याचा दंडुका आणि पोलिसांचा हिसका याची गंभीरतेने दाखल घेतली पाहिजे, अशा अपेक्षा सर्वसामान्य ठाणेकर व्यक्त करत आहेत. त्यातच पोलिस ठाण्यात प्रत्येकाची तक्रार लिहून घेऊन तपास करणे गरजेचे आहे. अनेकांच्या तक्रारी घेत नाहीत, सिव्हिल मॅटर आहे अशी सबब सांगण्यात येते. अशा‍ तक्रारी वाढत आहेत.

विविध प्रकारची वाढती गुन्हेगारी
-----------------
ठाण्यात आजच्या स्थितीला विनयभंग, गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, अनैतिक धंदे, बनावट नोटा, अमली पदार्थ तस्करी यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अवैध शस्त्रविक्रीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, विविध प्रकारचे गुन्हे हे सातत्याने घडत आहेत. त्यातच गंभीर घडलेल्या गुन्हेगारी घटनांची माहितीही प्रसारमाध्यमांना पुरवली जात नसल्याचा आरोपही सर्वसामान्य करत आहेत. सीसी टीव्ही फूटेज व्हायरल झाल्यानंतर गुन्ह्याची माहिती बाहेर पडते. त्यामुळे पोलिसांनी आपली कर्तव्ये पार पडल्यास गुन्हेगारांवर अंकुश लागण्यास मदत होईल, अशी आशा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.