दुसरी चित्रनगरी मिरा-भाईंदरमध्ये ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसरी चित्रनगरी मिरा-भाईंदरमध्ये ?
दुसरी चित्रनगरी मिरा-भाईंदरमध्ये ?

दुसरी चित्रनगरी मिरा-भाईंदरमध्ये ?

sakal_logo
By

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या चित्रनगरीनंतर दुसरी चित्रनगरी मिरा-भाईंदरमध्ये उभी राहाण्याची शक्यता आहे. उत्तनजवळील सरकारी जागेवर चित्रनगरी वसविण्याची संकल्पना असून त्याचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या चित्रनगरीत मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपट, मालिका, वेबसिरीजचे चित्रिकरण होत असते. पण सतत नावीन्याच्या शोधात असलेली ही मायानगरी चित्रिकरणासाठी नवनवे लोकेशनच्या शोधत असते. याचाच परिणाम म्हणून मुंबईबाहेर अनेक चित्रिकरण स्टुडिओ उभे राहिले आहेत. त्याला मिरा-भाईंदर हे शहरदेखील अपवाद नाही. आज काशिमिरा परिसरात असलेल्या वीस ते पंचवीस स्टुडिओमधून अनेक मालिका व रिॲलिटी शो चे चित्रिकरण सुरू असते. या स्टुडिओ व्यतिरिक्त एक सुसज्ज दुसरी चित्रनगरी उत्तन परिसरात उभी राहाण्याची शक्यता आहे.
भाईंदरच्या मेट्रो कारशेडवरून सध्या संघर्ष उभा राहिला आहे. मोर्वा गावात प्रस्तावित कारशेडला ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ही कारशेड उत्तन भागात असलेल्या सरकारी जागेत स्थलांतर करण्याच्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावानंतर जागेची चाचपणी करण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
उत्तन भागात एक हजाराहून अधिक हेक्टर सरकारी जागा आहे. या जागेच्या काही भागात जैवविविधता उद्यान निर्मितीचा प्रस्ताव आहे. या जागेतच कारशेड उभारण्यात यावी, असा प्रस्ताव सरनाईक यांनी दिला आहे. याव्यतिरिक्त उत्तन परिसराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार झाडी, डोंगर, समुद्रकिनारा यामुळे या सरकारी जागेत दुसरी चित्रनगरी उभी करणे सहज शक्य आहे व चित्रपटसृष्टी देखील त्याकडे आकर्षित होईल, कारशेड व जैवविविधता उद्यानानंतर शिल्लक राहिलेल्या जागेत दुसरी चित्रनगरी सहज उभारता येईल, असे सरनाईक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा तिढा सुटेल, चित्रनगरीच्या माध्यमातून सरकारला महसूल मिळेल, शिवाय स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी संकल्पना सरनाईक यांनी मांडली आहे.
......
कांदळवन पार्कचाही प्रस्ताव
उत्तनमधील या सरकारी जागेवर असलेल्या कांदळवनासाठी कांदळवन पार्क देखील विकसित करणे शक्य होणार आहे. यासंदर्भातला एक प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन असे शब्द उत्तन येथील निसर्गरम्य परिसरात लवकरच घुमू लागले तर आश्चर्य वाटायला नको.