ताल-सूर अन् नृत्याविष्काराची जुगलबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताल-सूर अन् नृत्याविष्काराची जुगलबंदी
ताल-सूर अन् नृत्याविष्काराची जुगलबंदी

ताल-सूर अन् नृत्याविष्काराची जुगलबंदी

sakal_logo
By

कल्याण, ता. २४ (बातमीदार) : ताल-सुरांची जुगलबंदी, विनोदी हास्यांचे फवारे आणि एकापेक्षा एक नेत्रदीपक नृत्याविष्काराने कल्याणमध्ये दिवाळी पहाट अविस्मरणीय झाली. सोमवारी (ता. २४) दीपावलीनिमित्ताने हजारो कल्याणकरांनी सूर व संगीताने मंतरलेली दिवाळी पहाट अनुभवली. भाजप व कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे साई चौकात आयोजित केलेल्या पाच तासांच्या रंगतदार कार्यक्रमात अविस्मरणीय गीते गुणगुणत तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही लावणीवर ठेका धरला. अनेक विनोदी चुटक्यांवर हास्यांचे फवारे उडाले. चित्रपटसृष्टीतील १३ कलाकारांच्या कलेने कल्याणकर मंत्रमुग्ध झाले होते.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या दिवाळी पहाटमध्ये नागरिकांचा अपूर्व उत्साह व जोश पाहावयास मिळाला. गायक अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, सावनी रवींद्र यांनी सादर केलेली गीते, अभिनेत्री अमृता खानविलकर व नृत्यांगना नेहा पेंडसे यांचे लावणीनृत्य, हास्य कलाकार गौरव मोरे, नम्रता संभेराव, वनिता खरात, श्याम राजपूत, चेतना भट यांचे विनोदी सादरीकरण आणि डान्स महाराष्ट्राची कलाकार तश्वी भोईर हिचे नृत्य रसिकांच्या पसंतीला उतरले. अव्वल कलाकारांच्या उपस्थितीत सकाळी साडेपाच वाजता झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत केला. त्यानंतर सकाळी १० वाजता ‘जय जय महाराष्ट्र’ व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, भाजपचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, वरुण पाटील आदींची उपस्थिती होती.

...................
पुढील वर्षी देवदिवाळीला कल्याणमध्ये दीपोत्सव
कल्याणची सांस्कृतिक परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी पुढील वर्षी देवदिवाळीला दीपोत्सव साजरा केला जाईल. त्याचबरोबर दिवाळी संध्या कार्यक्रम सुरू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यक्रमात केली.