मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा हायटेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा हायटेक
मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा हायटेक

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा हायटेक

sakal_logo
By

भाईंदर, ता.२४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिका शाळा लवकरच कात टाकणार आहेत. महापालिका शाळांमधून डिजिटल शिक्षणाचा श्रीगणेशा केला जाणार असून दिवाळीनंतर पन्नास वर्ग डिजिटल होणार आहेत.
महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांमधील पटसंख्येचा आलेख सातत्याने घसरत आहे. मात्र शाळांची ही अवस्था सुधारण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व ऊर्दू माध्यमाच्या ३६ शाळांमधील पन्नास वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे या वर्षी महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे एक हजारने वाढ देखील झाली आहे.
डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती चित्रफीत किंवा छायाचित्रांच्या स्वरूपात शिकवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे डिजिटल वर्ग मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात येणार आहेत. डिजिटल शिक्षणाची तयारी पूर्ण झाली असून दिवाळीच्या सुट्टीनंतर हे डिजिटल वर्ग अस्तित्वात येणार आहेत.
...
शिक्षकांना प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न डिजिटल माध्यमातून सहज सोडवता येणार आहेत. तसेच शिक्षकांनादेखील या डिजिटल वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले असून या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय शिकवले व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती वेळ दिला याचा अहवाल ऑनलाईन स्वरूपात जतन करण्यात येणार आहे.
...
डिजिटल वर्गांमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. तसेच डिजिटल वर्गांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळेतील वर्गात रंगरंगोटी, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, संगणक कक्ष या सर्वांच्या माध्यमातून शाळेची व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका