हात गमावलेल्या राहुलच्या जीवनात केईएमच्या डॉक्टरांनी आणला प्रकाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हात गमावलेल्या राहुलच्या जीवनात केईएमच्या डॉक्टरांनी आणला प्रकाश
हात गमावलेल्या राहुलच्या जीवनात केईएमच्या डॉक्टरांनी आणला प्रकाश

हात गमावलेल्या राहुलच्या जीवनात केईएमच्या डॉक्टरांनी आणला प्रकाश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेकदा रुग्णांना उपचार उपलब्ध होत नाहीत, अशी चर्चा केली जाते. नकारात्मक बाजूच बऱ्याचदा सांगितली जाते. पण पालिकेच्या केईएम रुग्णालयाची सर्वात दिलासादायक बाजू समोर आली आहे. २०१९ मध्ये फॅक्टरीत काम करत असताना दोन्ही हात गमावलेल्या राहुल अहिरवार या २२ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात केईएमच्या डॉक्टरांनी प्रकाशाचा किरण आणला. केईएम रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जन विभागातील आणि इतर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून राहुलच्या उजव्या हाताचे प्रत्यारोपण केले होते. केईएम रुग्णालयाच्या इतिहासात राहुलच्या हातांचे प्रत्यारोपण हे पहिलेच यशस्वी झाले आहे. मात्र फक्त हात प्रत्यारोपणापर्यंतच मर्यादित न राहता केईएम रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि काही निकटवर्तीयांनी राहुलला त्याच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार आता राहुलने त्याचा एमएससीआयटी हा कॉम्प्युटर कोर्सही पूर्ण केला असून पुढील शिक्षणाची त्याची तयारी सुरू आहे.
कोविडपूर्वी उपचार आणि हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत दाखल झालेला राहुल तब्बल अडीच वर्षांनंतर त्याच्या गावी मध्य प्रदेशला परतला आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने तो गेल्या सोमवारी मध्य प्रदेशमधील त्याच्या गावी गेला. दिवाळी साजरी केल्यानंतर तो पुन्हा मुंबईत परतणार आहे. गावी जाताना राहुलच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विश्वास आणि आनंद होता. कारण प्रत्यारोपण केलेला राहुलचा उजवा हात आता सर्व कामे करू लागला आहे. उजव्या हाताने हात मिळवणे, तसेच इतर काही गोष्टी स्वतः करतो; त्यामुळे आनंदी असल्याचे राहुलने सांगितले.

यूपीएससीचा अभ्यास सुरू
केईएम रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जन विभागाच्या प्रमुख डॉ. विनीता पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने एमएससीआयटीचा कोर्स पूर्ण केला आहे. तसेच, यूपीएससीचा अभ्यासही त्याने सुरू केला आहे. शिवाय, त्याचे बीए देखील सुरू आहे. सिविक सर्विस या विभागासाठी राहुल यूपीएससीसाठी तयारी करत आहे. त्याच्या दुसऱ्‍या हाताच्या प्रत्यारोपणासाठी त्याचे रजिस्ट्रेशन लवकर होईल, पण त्यापूर्वी त्याला आम्ही त्याच्या गावी जाण्याची परवानगी दिली. कारण त्याचे रजिस्ट्रेशन झाले तर त्याला पुढचे अनेक महिने मुंबईबाहेर जाता येणार नाही.

केईएमचा आधार
राहुलने बारावीची परीक्षा दिल्याच्या काही दिवसांनंतर त्याचे दोन्ही हात फॅक्टरीत झालेल्या अपघातात गेले. त्यानंतर त्याचे शिक्षण आणि रोजगार दोन्हीही थांबले. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या काही महिन्यांनंतर त्याच्या हाताच्या क्रिया सुरू झाल्या, तेव्हा डॉक्टरांनी त्याने शिक्षण पूर्ण करावे यासाठी प्रोत्साहन दिले. शिवाय, केईएम रुग्णालयाच्या एका विभागात त्याच्यासाठी कॉम्प्युटरचा क्लासही सुरू केला. गेले १३ महिने केईएममध्ये उपचार घेतल्यानंतर भाड्याच्या घरी राहण्यासाठी काही दानशूर संस्थांची मदत त्याला मिळवून दिली. शिवाय, त्याला दुसरा हातही लवकर उपलब्ध व्हावा आणि त्याचे आयुष्य आणखी सुखकर व्हावे यासाठी केईएममधील डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.

हाताच्‍या हालचालींवर ६० ते ७० टक्‍के नियंत्रण
राहुलचा कॉम्प्युटर कोर्स गेल्या सोमवारी पूर्ण झाला. घरी परतण्यापूर्वी राहुलने केईएम अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेतली. त्यावेळेस त्याने पहिल्यांदा हात मिळवून त्यांचे आभार मानले. सर्वात समानाधाची बाब म्हणजे राहुलचे त्याच्या हातांच्या हालचालींवर ६० ते ७० टक्के नियंत्रण आहे, असेही डॉ. पुरी यांनी सांगितले.