दिवाळी खरेदीत यंदा शेतकऱ्याचा हात आखडता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी खरेदीत यंदा शेतकऱ्याचा हात आखडता
दिवाळी खरेदीत यंदा शेतकऱ्याचा हात आखडता

दिवाळी खरेदीत यंदा शेतकऱ्याचा हात आखडता

sakal_logo
By

जव्हार, ता. २४ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील बहुतांश परिसर हा आदिवासी संस्कृतीने व्यापलेला आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील धान पिकाच्या कापणीला उशीर झाला आहे. त्यातच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची धान खरेदी ही दिवाळीपूर्वी करण्यात येत असते; परंतु यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आल्याने आणि शेतीचा हंगाम काहीसा लांबल्याने धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत दिवाळी साजरा करताना वस्तू खरेदीमध्ये शेतकऱ्यांनी आपला हात आखडता घेतल्याचे चित्र जव्हार तालुक्यात दिसत आहे.
लहरी निसर्ग अन् बेभरवशाची झालेली शेती, त्यामुळे अनेकांनी शेतीला रामरामच ठोकला आहे. त्यातही यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी अन् परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी सुरू आहे. धान विक्रीतून आलेल्या पैशांवर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत होती; परंतु यंदा परतीच्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे मळणीची समस्या निर्माण झाली असून दिवाळीच्या खरेदीत शेतकरी बाजारपेठेतून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शेतकरी दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर धानाची कापणी आणि मळणी करून त्याची विक्री करून दिवाळी साजरी करीत असतो. याच भरवशावरच शेतकऱ्यांची दिवाळी, कपडे-लत्ते, घरातील लग्न कार्य, कर्जफेड असे नियोजन केले जात असते; परंतु यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सर्व नियोजन कोलमडले आहे. त्यात सरकारकडूनही मदतीच्या नावावर तोंडाला पाने पुसण्यात आली असल्याचा नाराजीचा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.

........................................
प्रोत्साहान अनुदान
शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती; पण दिवाळी सण संपत आला तरी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही. जवळपास शंभर शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

.............................................
दरवर्षी दिवाळीच्या काळात धानाच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून शेतकरी कपडे खरेदी करतो, पण यंदा धानाची विक्रीच न करता आल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला नाही. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे चित्र आहे.
- रमाकांत सातपुते, शेतकरी, जव्हार