स्वरमय मैफिलीत वसईकर मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वरमय मैफिलीत वसईकर मंत्रमुग्ध
स्वरमय मैफिलीत वसईकर मंत्रमुग्ध

स्वरमय मैफिलीत वसईकर मंत्रमुग्ध

sakal_logo
By

वसई, ता. २४ (बातमीदार) : घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला, या अमर भूपाळीने दिवाळी पहाटेला सुरुवात झाली आणि एकापेक्षा एक स्वरमय गीतांनी वसईकर मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते वसई-विरार शहर महापालिकेने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या वेळी मोठ्या प्रमाणात रसिकांनी हजेरी लावल्याचे गायकांचाही उत्साह द्विगुणित झाला.
वसई पश्चिम येथील वायएमसी सभागृहात महापालिकेने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, सहायक उपायुक्त ग्लिसन गोन्साल्विस, विवेक चौधरी, माजी नगरसेवक विजय वर्तक, माया तळेकर, पुष्पा जाधव, कवी तथा लेखक प्रकाश पाटील, प्रकाश वनमाळी, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी चांदणे शिंपीत जाशी, घन:श्याम सुंदरा, लाजून हासणे, चंद्र आहे साक्षीला, मलमली तारुण्य माझे, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, कट्यार काळजात घुसली चित्रपटातील सुरत पिया की, मृग नयना, प्रथम तुझं पाहता, शूर आम्ही सरदार, शुक्रतारा मंदवारा यासह विविध गाणी गात गायक अभिजित कोसंबी, कीर्ती किल्लेदार, पंडित सुरेश बापट यांनी सुरेल आवाजात रसिकांना खिळवून ठेवले; तर निवेदिका अनघा मोडक यांनी विशेष शैलीत शांता शेळके, बालगंधर्व यांच्यासह अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी प्रकाश वनमाळी यांनी उपस्थितांचे आभार मानत कोरोनानंतर पुन्हा एकदा वसईकरांना दिवाळी पहाटचा आनंद मिळाला, अशा शब्दांत भावना व्यक्त केली.
-------------
यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघ, अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघाकडून पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह, विरार पश्चिम येथे दिवाळी पहाटचे आयोजन स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील व गायक संदीप फाटक यांनी केले होते. या वेळी सोहम निर्मित गाणी तुमच्या आमच्या मनातली या कार्यक्रमात रसिक उपस्थित होते.
-------------
वसई : दिवाळी पहाट कार्यक्रमात गाणी सादर करताना गायक.