लहानग्यांनी साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहानग्यांनी साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती
लहानग्यांनी साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती

लहानग्यांनी साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा आहे. दिवाळीत किल्ला बांधला, की सकारात्मकतेच बीज मनामध्ये रुजवण्याचे काम आपोआप होते. हीच गोष्ट परंपरा बनत जाते आणि दिवाळीला किल्ला तयार करणे हे काम सातत्याने सुरू राहते. अशीच परंपरा मुंबईतील सांताक्रूझ विघ्नहर्ता या मंडळातील काही छोट्यांनी जपली आहे. छोट्यांच्या या उत्साहाला भारावून काही तरुण मंडळीही त्यांना या कामात मोठा पाठिंबा देतात. सर्वांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने सलग आठव्या वर्षी या मंडळांच्या बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्‍या किल्ले शिवनेरीची प्रतिकृती साकार केली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून या मुलांनी आपली परंपरा कायम ठेवत किल्ला बनवण्याचा आनंद लुटला. एक ते दोन दिवसांच्या कालावधीत दिवस रात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी एक शिवनेरी किल्ला या मुलांनी साकारला आहे. फक्त किल्ला साकारायचा आणि दिवाळीची मजा करायची असा संकल्प न ठेवता अगदी अभ्यास करून बारीक सारीक गोष्टींचा विचार करत नकाशाचा वापर करत हुबेहूब किल्ला या मुलांनी साकारला आहे. किल्ल्याची तटबंदी, बाजूला असलेली झाडे या आणि अशा बऱ्याच गोष्टी छोटेखानी किल्ल्यात दाखवण्यात आल्या आहेत.
किल्ला तयार करणारी मुले ही १० ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. या आधीही या मंडळातील मुलांनी अशा प्रकारचे किल्ले साकारले आहेत. या किल्ल्यांसाठी लागणारी सामुग्री मुलांना पुरवण्यात आली. त्यानंतर उत्साही मुलांनी सहभाग घेत हा किल्ला तयार केला. आपली परंपरा आपणच जपली पाहिजे याचे सुप्त ज्ञान आधीच या मुलांमध्ये असल्याकारणाने ही मुले किल्ला बनवण्यासाठी पुढाकार घेतात, असे मंडळाचे सदस्य सांगतात.