मालवण किल्ला पाहायला नागरिकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण किल्ला पाहायला नागरिकांची गर्दी
मालवण किल्ला पाहायला नागरिकांची गर्दी

मालवण किल्ला पाहायला नागरिकांची गर्दी

sakal_logo
By

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : सांस्कृतिक शहर म्हणून डोंबिवलीनंतर बदलापूर शहराची ओळख होत आहे. अनेक सण, उत्सव अगदी परंपरेने साजरे करणाऱ्या बदलापूरकरांनी दिवाळीत किल्लेबांधणी उपक्रमालादेखील चांगला प्रतिसाद दिला आहे. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव परिसरातील वर्धमान सोसायटीमध्ये यंदा इतिहासातील प्रसिद्ध तब्बल ४० फुटी लांब सिंधुदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बदलापूर शहरात किल्ले प्रदर्शनात ऐतिहासिक असे अनेक किल्ले बांधून दरवर्षी वर्धमान सोसायटीने अव्वल क्रमांक पटकावला आहे. लहान, तरुण असे १० ते १२ जण मिळून मोठ्या हौसेने दरवर्षी किल्ला उभारतात. दरवर्षी सोसायटीमधील या मुलांची सहल राज्यातील विविध किल्ल्यांवर नेली जाते. तिथे जाऊन किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊन अभ्यासपूर्वक या सोसायटीमधील ही मुले दगड, माती, गेरू, शाडू माती, नैसर्गिक रंग वापरून किल्ला उभारतात. या वर्षी या सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची व उत्तुंग शिल्पकलेची, स्थापत्यकलेची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

................

१२ दिवस मेहनत
यात किल्ल्याचा महादरवाजा, किल्ल्याची तटबंदी, बुरुज तसेच त्या काळी किल्ल्यावरील जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न या सोसायटीधारकांनी केला आहे. १२ दिवस मेहनत घेऊन हा किल्ला बनवण्यात आला आहे. हा किल्ला उभारण्याची संकल्पना आतिष बिरवाडकर, प्रणय वंजारे, अंजली पाटील, मोना बिरवाडकर, सुनीत घडशी, सोहम यादव व इतर लहान मुलांनी यात सहभाग घेतला. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.