विमानतळावर १५ कोटींचे ड्रग्स जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळावर १५ कोटींचे ड्रग्स जप्त
विमानतळावर १५ कोटींचे ड्रग्स जप्त

विमानतळावर १५ कोटींचे ड्रग्स जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई पथकाने मुंबई विमानतळावर १५ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची खेप जप्त केली आहे. ही खेप पॅरिसहून आली असून, ती नालासोपारा आणि लगतच्या परिसरात विक्रीसाठी नेण्यात येणार होती. या कारवाईदरम्यान ‘डीआरआय’ने नायजेरियाच्या नागरिकासह तिघांना अटक केली आहे.

विमानतळावर जप्त केलेल्या अमली पदार्थांचे कुरिअर पार्सलच्या रूपात मुंबईत पोहोचल्याचे समजते. या पार्सलमध्ये सुमारे १.९ किलो अॅम्फेटामार्इन नावाचा अमली पदार्थ आढळला. डीआरआयने ही खेप जप्त केल्यानंतर या ड्रग्जच्या सिंडिकेटचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमली पदार्थांचे पार्सल घेण्यासाठी एक नायजेरियन नागरिक आला होता. त्याची चौकशी केली असता त्याने साखळीशी संबंधित अन्य व्यक्तीचे नाव सांगितले. त्याच वेळी डीआरआयने दुसऱ्याला पकडले असता त्याने तिसऱ्याचे नाव सांगितले. अशाप्रकारे तिघा संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या साखळीतील उर्वरित सदस्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आठवडाभरापूर्वी डीआरआयला हे अमली पदार्थ मुंबईत पोहोचल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीवरून डीआरआयने विमानतळावर इंटरसेप्टर बसवले. २० ऑक्टोबरला अमली पदार्थांची खेप विमानतळावर उतरली. त्यानंतर पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरिन नागरिक आणि दोघांना पथकाने ताब्यात घेतले.

संघटितरीत्या तस्करी
अमली पदार्थांच्या तस्करांनी मालाच्या तस्करीची संपूर्ण चोख व्यवस्था केली होती. हे अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. तसेच त्यांच्या वितरणासाठी तस्करांची साखळीही तयार केली होती. या साखळीत सहभागी सदस्यांना एकमेकांची माहितीही नव्हती, एवढी गोपनीयता पाळण्यात आली. अटक केलेले तिघे जण याच साखळीतील असल्याचे पोलसांनी सांगितले.