रंगली मुंबईकरांची सकाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगली मुंबईकरांची सकाळ
रंगली मुंबईकरांची सकाळ

रंगली मुंबईकरांची सकाळ

sakal_logo
By

दिवाळीच्या जल्लोषात मुंबई रंगली
शुभेच्छांचा वर्षाव, दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः कोरोना महामारीचा दोन वर्षांचा कठीण काळ संपल्यानंतर प्रथमच आलेल्या निर्बंधमुक्त दिवाळीनिमित्त आज सर्वत्र मनसोक्त जल्लोष पाहायला मिळाला. सकाळी अभ्यंगस्थान करून नव्या पेहरावात अनेकांनी आप्तस्वकीयांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांच्या रोषणाईमुळे दीपोत्सवाचा अनोखा नजारा पाहायला मिळाला.
मागील दिवाळीतही कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेचे सावट असल्याने मुंबईकर धास्तावलेच होते; मात्र आता कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने खरेदी, नातलगांच्या भेटी, एकत्रित फराळ, दिवाळी पहाट कार्यक्रम, इमारतींमधील सांस्कृतिक सोहळा, मातीचे किल्ले इत्यादी पूर्वीची सणाची नजाकत पाहायला मिळाली. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यानेही सर्वांच्या उत्साहात भर पडली होती. आज सकाळी अभ्यंगस्नान आणि फराळ करून अनेकांनी आपले नातलग वा मित्र-परिचितांकडे जाऊन एकमेकांचे अभीष्टचिंतन केले. गिरगाव, मुंबादेवी, ग्रँट रोड, भायखळा, दादर, परळ, माहीम, विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपर, मुलुंड, भांडुप इत्यादी परिसरात सकाळपासून दिवाळीच्या जल्लोषासाठी रस्ते फुलून गेले होते. नवेकोरे आणि पारंपरिक कपडे घालून सकाळच्या प्रसन्न वातावरणात एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छांचा वर्षाव होत होता. दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त प्रमुख मंदिरात देवदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर पोटपूजेसाठी हॉटेलेही भरून गेली होती. संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घराघरांत आणि जवळपास प्रत्येक दुकानामध्ये व्यापाऱ्यांनी लक्ष्मीची आणि आपल्या हिशेबांच्या पुस्तकांची पूजा केली. लक्ष्मीपूजनानिमित्त सराफांच्या दुकानांसह इतरही ठिकाणी खरेदीचा जोर होता.
रविवारी संध्याकाळी शहरातील सर्वच उपनगरांमधील बाजारपेठा खच्चून भरल्या होत्या. पाय ठेवायलाही जागा नसल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती.
शहरातील कित्येक इमारती कंदील आणि दिव्यांच्या रोषणाईने गजबजून गेल्या होत्या. रात्री त्यात फटाक्यांच्या आतषबाजीची भर पडली. अवघी मुंबई रोषणाईच्या सप्तरंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत होते.

‘दिवाळी पहाट’चा आस्वाद
ठिकठिकाणी झालेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचा आस्वाद घेत मुंबईकरांनी दीपावलीला दणक्यात सुरुवात केली. नुकतेच राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यंदाचे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आघाडीवर होते. बोरिवली पूर्वेतील नॅन्सी कॉलनी परिसरात मागाठाणे विधानसभा भाजप आणि वीर सावरकर नगर यांच्यातर्फे संयुक्तपणे दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर मैफलीचे आयोजक होते. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, मनोज जोशी, स्वप्नील जोशी, तुषार देवल, अभिनेत्री श्रेया बुगडे, निशा परुळेकर, स्वाती देवल, क्षमा निनावे तसेच भाजपचे पदाधिकारी मैफलीला हजर होते.