सळसळत्या उत्साहाला परंपरेचा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सळसळत्या उत्साहाला परंपरेचा साज
सळसळत्या उत्साहाला परंपरेचा साज

सळसळत्या उत्साहाला परंपरेचा साज

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ (बातमीदार) : उत्सवांची पंढरी बनत चाललेल्या ठाण्यात यावर्षी ‘दिवाळी पहाट’ला तरुणाईच्या उत्साहाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. पारंपरिक वेशभूषा करत हजारो तरुण-तरुणींचे जथ्थेच्या जथ्थे मासुंदा तलावाजवळ जमा झाले. पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरू झालेला हा ‘दिवाळी पहाट’चा कार्यक्रम दुपारचे दोन वाजले तरी सुरूच होता. त्यामुळे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने ठाणे आज गजबजून गेले होते.
पहाट उजाडताच ठाण्याच्या मासुंदा तलावाभोवती तरुणाईची गर्दी जमू लागली. नाकात नथ, पारंपरिक दागिने आणि फॅन्सी साडी नेसून आलेल्या तरुणी... तर दुसरीकडे झब्बाकुडता घातलेले तरुण... तासाभरात या गर्दीने संपूर्ण तलावाला वेढा घातला आणि पुढच्या तासातच राममारुती रोड, गोखले रोड, चरई ते थेट टेंभीनाका, स्थानक परिसर तरुणाईच्या उत्साहाने फुलून गेला. विशेष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाच्या युवासेनेने ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे वेगवेगळे आयोजन केले होते, पण राजकारण बाजूला ठेवत तरुणाईने दोन्ही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद लुटला. यावेळी मित्र-मैत्रिणींच्या सेल्फीचा कार्यक्रमही जोरात सुरू होता. लावणी सम्राज्ञी हर्षा हिच्या ठेक्यावर तरुणाईनेही ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. गाठीभेटी झाल्यानंतर पोटपूजा करण्यासाठी तरुणाईने आपला मोर्चा नंतर वडापाव गाडीपासून ते हॉटेलपर्यंत वळवला.
वाहतूक कोंडीत भर
‘दिवाळी पहाट’चा कार्यक्रम लांबल्याने ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली. ठाणे स्थानक ते हरिनिवास सर्कल, चरई, टेंभीनाकापर्यंत पाऊल ठेवायलाही रस्त्यावर जागा नव्हती. फूटपाथवरही दुचाकी वाहने पार्क करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मार्गांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.