कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल करा!
कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल करा!

कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : लोकलमधील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून १४ वर्षांपासून केली जात आहे; मात्र राज्य सरकारकडून याबाबत सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळीनंतर मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

राज्य सरकारने आणि महापालिकांनी मोनो, मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात लोकल हीच खऱ्या अर्थाने महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून ती सुधारण्याची अत्यंत आवश्यक आहे; मात्र दुर्दैवाने रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत उदासीन असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. लोकल वाहतुकीतील सुधारणांबाबत रेल्वे प्रवाशांच्या वतीने रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला अनेक निवेदने, सूचना आणि मागण्या वारंवार केल्या जातात; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

मुंबईच्या लोकल सेवेतील गर्दीच्या नियोजन आणि नियंत्रणासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयांच्या वेळा बदलाव्यात, याबाबत सरकारला कोणताही खर्च नसलेली; पण अत्यंत गरजेची मागणी गेली १४ वर्षे करत आहोत; मात्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
---
मुंबई आणि उपनगरांतील कार्यालयांच्या वेळा बदलल्यास लोकलमधील गर्दी विभाजित तर होईलच, शिवाय लाखो प्रवाशांनाही दिलासा मिळू शकतो. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सूचनेचे स्वागतही केले होते. त्यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट निर्देशही दिले होते; मात्र सरकार त्याबाबत दुर्लक्ष करत आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
......
काय आहेत मागण्या?
- सर्व बँका, फायनान्स कंपन्या आणि १० पेक्षा कमी कर्मचारी असणारी सर्व खासगी कार्यालये सकाळी ९.३० वाजता सुरू करावीत.
- केंद्र आणि राज्य सरकारची सर्व कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सकाळी १०.३० वाजता सुरू करावीत.
- सर्व कॉर्पोरेट कंपन्या, खासगी कार्यालये सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात यावीत.