भिवंडीत किल्ले निर्मितीतून इतिहासाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत किल्ले निर्मितीतून इतिहासाचे धडे
भिवंडीत किल्ले निर्मितीतून इतिहासाचे धडे

भिवंडीत किल्ले निर्मितीतून इतिहासाचे धडे

sakal_logo
By

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : दिवाळीत किल्ले दर्शन स्पर्धेत भाग घेण्याचा भिवंडीतील मुलांचा उत्साह वाढत आहे. त्याकरिता मुलांनी इंटरनेटवर माहिती घेऊन हुबेहूब किल्ले बनविण्याचा केलेला प्रयत्न स्पर्धेच्या परीक्षकांना आव्हानात्मक ठरला आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अथवा इतर इव्हेंटमध्ये लाखो रुपये खर्च करून आयोजक सजावट करताना अनेक वेळा इतिहासाची अथवा घटनेची सांगड घालण्यापेक्षा उधळपट्टीवर जास्त भर देताना दिसतात. दिवाळीत किल्ले बनविणारी लहान मुले दरवर्षी नव्याने काही गोष्टी शिकत असतात. शहरात दिवाळीच्या सुट्टीत अनेक ठिकाणी लहानमोठे मातीचे किल्ले बनवले जातात. त्यापैकी जास्त किल्ले कोंबडपाडा आणि परिसरात बनविले जात आहेत. भिवंडीत गेल्या २५ वर्षांपासून भिवंडी वार्ताच्या वतीने किल्ले दर्शन स्पर्धा घेतल्या जात असून या स्पर्धा राजू घैसास यांनी समर्थपणे सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे लहान वयातच मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी माहिती मिळविण्याची ईर्षा निर्माण झाल्याचे दिसून येते.
यावर्षी स्पर्धेमध्ये एकूण ६० मंडळांनी भाग घेतला असून त्यापैकी अनेकांनी सफाईदार व हुबेहूब किल्ल्याची प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. सध्या इंटरनेटवर किल्ल्याचा नकाशा आणि माहिती मिळाल्यानंतर ही मुले स्वतः अंगमेहनत करून व पदरचे पैसे खर्च करून मातीचे किल्ले बनवत आहेत. ज्याप्रमाणे गणपती उत्सवाची सजावट पाहण्यास प्रेक्षक फिरतात, त्याप्रमाणे सर्व घटकातील आबालवृद्धांनी किल्ल्यांना भेटी देऊन महाराजांच्या स्वराज्याची बांधणी समजून घेतली तर आमच्या मेहनतीचे व आभ्यासाचे चीज होईल, अशी प्रतिक्रिया किल्ले दर्शन स्पर्धेतील स्पर्धकांनी व्यक्त केली.