गरिबांची दिवाळी रेशनिंग दुकानाच्या रांगेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरिबांची दिवाळी रेशनिंग दुकानाच्या रांगेत
गरिबांची दिवाळी रेशनिंग दुकानाच्या रांगेत

गरिबांची दिवाळी रेशनिंग दुकानाच्या रांगेत

sakal_logo
By

मनोर, ता. २५ (बातमीदार) : परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक पाण्यात भिजून खराब झाल्याने शेतकरी रेशनिंगच्या धान्याकडे डोळे लावून बसले आहेत. अशात दिवाळी सणाच्या तोंडावर पुरवठा विभागाच्या ऑनलाईन बायोमेट्रिक यंत्रणेचा सर्व्हर डाऊन असल्याने गेल्या तीन दिवसांपासून धान्यवाटप रखडले आहे.
पालघर जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. अशात दिवाळी सण तोंडावर आल्याने शेतकरी आणि गरिबांचे पुरवठा विभागाच्या रेशनिंग दुकानातून उपलब्ध होणाऱ्या धान्याकडे लागले होते. गोदामातून धान्य रेशनिंग दुकानापर्यंत पोहोचले; परंतु धान्याचे ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन असल्याने गेल्या तीन दिवसांपासून धान्यवाटप रखडले आहे. यामुळे धान्य खरेदीसाठी लाभार्थी दुकानांसमोर रांगा लावत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी ई पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे बायोमेट्रिक घेतले जाते. सर्व्हर डाऊन असल्याने बायोमेट्रिक यंत्रणा बंद आहे. शनिवारी बहुतांश रेशनिंग दुकानातून धान्य वाटप झालेले नाही. रविवारी सकाळपासून हीच स्थिती होती. सोमवारी दुपारनंतर लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिधा वाटप सुरू करण्यात आले आहे.

......
ऑफलाईन धान्यवाटप करण्याच्या सूचना रेशनिंग दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना धान्य वितरण न करणाऱ्या दुकानदारांची माहिती घेतली जात आहे. दिवाळीसाठी लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरळीत याची दक्षता घेतली जाईल.
- तानाजी शिंदे, पुरवठा निरीक्षक

....
‘आनंदाचा शिधा’चा पुरवठा नाही
गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेले ‘आनंदाचा शिधा’ किटवाटप दिवाळी सुरू झाल्यानंतरही रेशनिंग दुकानात उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे गरिबांची दिवाळी रेशनिंग दुकानाच्या रांगेत जात आहे. पालघर तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारपर्यंत रेशन दुकानांवर किट पोहोचलेले नाही.
.....
ऑफलाईनची सोय तात्पुरतीच
सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. तर नियमित धान्य आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत धान्यासाठी ऑनलाईनचीच पद्धत कायम राहणार आहे.