वन स्टॉप सेंटरचा पिडीत महिलांना आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन स्टॉप सेंटरचा पिडीत महिलांना आधार
वन स्टॉप सेंटरचा पिडीत महिलांना आधार

वन स्टॉप सेंटरचा पिडीत महिलांना आधार

sakal_logo
By

पीडित महिलांचे ‘आधारघर’
‘वन स्टॉप सेंटर’मुळे तीन वर्षांत १२०० हून अधिक जणींना दिलासा

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईत महिलांविषयक अनेक गुन्हे वा हिंसक प्रकार घडत असतात. अशा घटनांमुळे मनोधैर्य खचलेल्या आणि आत्मविश्वास वा जगण्याची उमेद गमावलेल्या महिलांना केईएम रुग्णालयातील ‘वन स्टॉप सेंटर’ तीन वर्षांपासून दिलासा देत आहे. पीडित महिलांसाठी ते जणू ‘आधारघर’च झाले आहे. प्रत्येक गुन्ह्याची कायदेशीर बाब समजावून सांगून पीडितांचे समुपदेशन करत त्यांना हवी ती सर्व मदत केंद्रात केली जात आहे.
१८ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या ‘वन स्टॉप सेंटर’अंतर्गत आतापर्यंत जवळपास ११३८ महिला आणि ८५ बालकांना दिलासा देण्यात यश आले आहे. दररोज जवळपास ६० ते ७० महिला वेगवेगळ्या कारणांनी केंद्राला भेट देत आहेत. १५ जणांची सक्षम टीम त्यांच्यासाठी काम करत आहे.
सध्या मुंबई आणि उपनगरात दोन ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत आहेत. शिवाय, येत्या काळात कामा रुग्णालयात आणखी एक केंद्र सुरू होईल. त्याचा सर्वाधिक फायदा महिलांना होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी सांगितले.

केंद्राचा उद्देश...
‘वन स्टॉप सेंटर’ महिला आणि बालविकास विभाग यांच्याअंतर्गत येत असून तो केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्प आहे. हिंसा पीडित महिला आणि बालकांसाठी ते २४ तास कार्यरत आहे. समुपदेशन, वैद्यकीय मदत, पोलिस सहकार्य, कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा अशा काही सेवा केंद्रात दिल्या जातात. केंद्रावर महिला किंवा बालकांच्या गरजेनुसार काम केले जाते. समुपदेशन, मानसिक आधार आणि निर्णय घेण्याबाबत त्यांना सक्षम केले जाते. सोपी पोलिसी कार्यवाही, वैद्यकीय सुविधा, विधी सेवा इत्यादी अनेक सेवा केंद्राअंतर्गत महिला व १८ वर्षांखालील हिंसाग्रस्त बालकांना दिल्या जातात.

१५ जणांची सक्षम टीम
‘वन स्टॉप सेंटर’मध्ये एकूण १५ जणांची सक्षम टीम काम करते. एक केंद्र प्रशासक, दोन समुपदेशक, तीन केसवर्कर, चार पॅरा मेडिकल नर्स, एक माहिती तंत्रज्ञान कर्मचारी, एक कायदेविषयक सल्लागार, एक बहुउद्देशीय कामगार, दोन सुरक्षारक्षक आणि एक पोलिस सुलभीकरण अशी टीमची रचना आहे.

जास्तीत जास्त समुपदेशन केंद्रांची गरज
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मोठ्या प्रमाणात समुपदेशन केंद्रांची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘वन स्टॉप सेंटर’चा उद्देशच महिलांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्या, असा आहे. मुलींसह मुलांनाही वागणुकीचे धडे आई-वडिलांनी द्यायला हवेत. सध्या लग्नापूर्वी समुपदेशन केंद्राचीही गरज वाढली आहे. त्यातून कुटुंबव्यवस्थेत नेमकी गरज काय आहे, याची जाणीव करून दिली, तर अनेक कुटुंबांचा संसार सुखाचा होईल, असे चाकणकर म्हणाल्या.

संशयास्पद प्रकरणात मार्गदर्शन
झारखंडमधील एक कुटुंब आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या उपचारांसाठी केईएम रुग्णालयात आले होते. मुलगी चार महिन्यांची असताना अचानक तिच्या शरीरावर कापल्याचे व्रण दिसू लागले होते. ती मुलगी शेजारी राहणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडे खेळायला गेली की व्रण नव्याने दिसायचे. मुलीच्या पोटावरही टाके आहेत. तिची जीभही कापली गेल्याने शस्त्रक्रियेसाठी तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या अंगावरील खुणा संशयास्पद वाटल्याने ‘केईएम’मधील वन स्टॉप सेंटरमधील अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर केंद्रातील समुपदेशकांनी मुलीची भेट घेतली. सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने वन स्टॉप सेंटरला पोलिस आणि बालकल्याण समितीची मदत घ्यावी लागली. समुपदेशकांनी मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले आणि अशा प्रकरणात लागणारा पोलिसी वा कायदेविषयक सल्ला त्यांना दिला.

समुपदेशनानंतर सुनेविरोधात तक्रार
एका सुनेने भांडणादरम्यान सासूच्या तोंडावर ॲसिड फेकले. सासूच्या कपाळाची डावी बाजू आणि डोळा भाजला. पालिकेच्या रुग्णालयात ती तपासणीसाठी आली असता, तिला कर्करोग असल्याचे समजले. डॉक्टरांनी तिला टाटा रुग्णालयात पाठवले. ॲसिडमुळे महिलेच्या कपाळाच्या डाव्या बाजूला आणि डोळ्याला संसर्ग झाला होता; तरीही सासूने सुनेविरोधात कोणतीही तक्रार नोंदवली नाही. रुग्ण महिलेच्या मुलीने ‘वन स्टॉप सेंटर’ला भेट दिली. समुपदेशकांनी मुलीला कायदेशीर माहिती दिली. शिवाय सुनेविरोधात कायद्याला धरून तक्रार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. कायदेशीर बाबींसह मोफत वैद्यकीय मदत, ॲसिड हल्ला पीडितांसाठी असलेले उपचार आणि मनोधैर्य योजनेबाबत माहिती दिली. त्यानंतर महिलेने सुनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.