मिरा-भाईंदरमध्ये नोव्हेंबरपासून श्वान निर्बिजीकरण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये नोव्हेंबरपासून श्वान निर्बिजीकरण सुरू
मिरा-भाईंदरमध्ये नोव्हेंबरपासून श्वान निर्बिजीकरण सुरू

मिरा-भाईंदरमध्ये नोव्हेंबरपासून श्वान निर्बिजीकरण सुरू

sakal_logo
By

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प झालेले मिरा-भाईंदर महापालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्बीजीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली असून गेल्या एक महिन्यापासून ते सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
महापालिकेचे उत्तन येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या ठिकाणी दररोज अठरा ते वीस श्वानांवर शस्त्रक्रिया केली जात होती. केंद्रात श्वान ठेवण्यासाठी चाळीस पिंजरे होते. यातील तीस पिंजरे निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केलेले श्वान ठेवण्यासाठी; तर उर्वरित पिंजरे उपचारासाठी आणलेल्या जखमी श्वानांसाठी वापरले जात होते; पण या पिंजऱ्‍यांची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी जास्त श्वानांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होत नव्हते. शिवाय शहरातील श्वानांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी आता शंभर पिंजरे आणले आहेत. शिवाय केंद्र वातानुकूलित करून शस्त्रक्रिया कक्षाचा आकारही वाढवला आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज चाळीस श्वानांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. निर्बीजीकरण केंद्रासाठी महापालिकेने सुमारे पन्नास लाख रुपये खर्च केला आहे.
....
कंत्राट संपले
कंत्राटदार संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरणाचे काम केले जात आहे; पण या संस्थेचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे निर्बीजीकरणाची प्रक्रिया गेले कित्येक महिने ठप्प झाली होती. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याचा आरोपदेखील केले जात होते. नवे श्वान निर्बीजीकरण केंद्रदेखील तयार होऊन जवळपास एक महिना उलटून गेला आहे. पण केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. दुसरीकडे मिरा रोडमध्ये महापालिकेने श्वान निर्बीजीकरण केंद्र बांधले आहे. हे केंद्रही अद्याप सुरू झालेले नाही.
...
श्वान निर्बीजीकरण केंद्रात शंभर पिंजरे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. निर्बीजीकरण करणाऱ्‍या कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या एक नोव्हेंबरपासून निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू केले जाणार आहे.
- डॉ. विक्रम निराटले, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका