ऐन दिवाळीत रस्त्यावर कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन दिवाळीत रस्त्यावर कचरा
ऐन दिवाळीत रस्त्यावर कचरा

ऐन दिवाळीत रस्त्यावर कचरा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : ऐन दिवाळीत कल्याण-डोंबिवली शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून या कचऱ्याची दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागत आहे. दिवाळीची सुरुवात ही प्रसन्नमनाने व्हावी, असे वाटत असताना, डोंबिवलीकरांची दिवसाची सुरुवात ही कचऱ्याच्या दुर्गंधीने होत आहे. मधुबन टॉकीज गल्ली परिसरात रस्त्यावर कचरा टाकण्यात आला होता. दुपार होत आली, तरी घंटागाडी आली नसल्याने कचऱ्याने पूर्ण रस्ता व्यापलेला होता. दिवाळीच नाही, तर इतर दिवशीही ही परिस्थिती या ठिकाणी असते. या कचरादुर्गंधीने नागरिक, व्यापारी हैराण आहेत. प्रभाग अधिकारी याकडे लक्ष देणार का, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका घनकचरा विभागाने कचराप्रश्नी शून्य कचरा मोहीम, कचरा कुंड्या हटविणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण, बड्या गृहसंकुलांनी कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणे आदी उपाययोजना शहरात राबविल्या आहेत. स्टेशन परिसर, शहरातील महत्त्वाच्या जागेवरील कचराकुंड्या हटल्याने दिवसभर त्या ठिकाणी साचणारा कचरा कमी झाला. कचराकुंड्या हटल्या, तरी त्या ठिकाणचा कचरा हटत नसल्याने घनकचरा विभागाच्या घंटागाड्या तेथील कचरा उचलतात. परिसरात कचरा साचू नये म्हणून पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत असले, तरी त्यात यश येताना दिसत नाही.
डोंबिवली स्टेशन परिसरातील मधुबन टॉकीज गल्ली परिसरात भाजी-फूल मार्केट, दुकाने, हॉटेल्स आहेत. या ठिकाणी जमा होणार कचरा रात्री एका ठिकाणी दुकानदार, व्यापारी टाकतात. घंटागाडी सकाळी येऊन हा कचरा उचलून नेते. सकाळी ९-१० नंतर गाडी येत असल्याने दिवसा रेल्वे स्टेशन गाठणारे प्रवासी, विक्रेते, मार्केटमधील कामगार यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. कधीकधी तर गाडीही दुपारी १२ वाजता येत असल्याने कचऱ्याची दुर्गंधी जास्त पसरते. दिवाळीचे दिवस असूनदेखील हीच परिस्थिती असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

............................
प्लास्टिक, ओला कचरा एकत्रच
मार्केट परिसर असल्याने येथे दररोज मोठ्या स्वरूपात कचरा जमा होतो. ओला, सुका कचरा यात एकत्रच टाकला जातो. शिवाय प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाणदेखील जास्त असते. यावर नियम नाही का, असा सवाल नागरिक करतात. सकाळी शुद्ध हवा ही आम्हाला मिळतच नाही. मध्यंतरी पालिका आयुक्त यांनी डोंबिवली शहराची पाहणी केली असता रस्त्यावरील कचऱ्यावरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. मात्र ही बाब प्रभाग अधिकाऱ्यांनी मनावर घेतली नसल्याचे दिसून येते.