चायवेलीची भाकर, चवळीच्या भाजीने दिवाळी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चायवेलीची भाकर, चवळीच्या भाजीने दिवाळी साजरी
चायवेलीची भाकर, चवळीच्या भाजीने दिवाळी साजरी

चायवेलीची भाकर, चवळीच्या भाजीने दिवाळी साजरी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : विक्रमगड व परिसरातील शेतकरी चायवेलीची भाकर, चवळी, डांगर, भाजी खाऊन आनंदात दिवाळी साजरी करीत असतात. येथील खेड्यापाड्यावरील शेतकरी पारंपरिक व निसर्गाशी एकरूप होऊन दिवाळी साजरी करीत असतो. आपट्याच्या पानाप्रमाणे जोडलेली चायवेलीची पाने आणि झाडांच्या सुकलेल्या फांद्यांचा भारा शेतकरी महिला दिवाळीसाठी जंगलातून आणतात. आपल्या शेतात पिकवलेले भात उखळातून काढून आणि सुपातून पाखडून त्याचे तांदूळ तयार करतात. घरातील जात्यावर तांदूळ दळून त्याचे पिठ काढतात. मोठी काकडी घेऊन ती मधोमध उभी चिरतात. नदीतील शिंपल्याने ती खरवडून काकडीचे तुकडे दळलेल्या पिठात मळून घेतात. चायवेलीच्या पानाच्या आकाराएवढा पिठाचा गोळा घेऊन चायवेलीच्या पानात थापटून घेतात. लाकडे पेटवून मोठ्या पातेल्यात चायवेलीच्या पानावरील भाकरी उकडून घेतली जाते. लाल भोपळा (डांगर) कापून, चवळी आणि बोंबिल यांची भाजी करतात. भाजी-भाकरीचा हा पदार्थ दिवाळीत खेड्यातील शेतकऱ्यांच्या घराघरात तयार केला जातो.

ग्रामीण डोंगराळ भागात शेणाचा व चिबुडाचा दिवा
----------------------------------------
ग्रामीण डोंगराळ भागात शेतकरी पणती म्हणजे कोड्या मिळाला नाही तर शेणाचा दिवा किंवा चिबुड कापून दिवा करतात. त्यात तेल टाकून तो पेटवतात. झेंडूच्या फुलांना शेतकरी मखमलीची फुले असे म्हणतात. ती फुले, लोंगर आणि आंब्याची पाने यांच्या माळा करून घरच्या दर्शनी भागात लावतात. गरिबातला गरीब शेतकरीही आपल्या मुलांना दिवाळीत नवीन कपडे घेत असतो.