जेएनपीएची विश्वस्त पदाची १५ नोव्‍हेंबरला निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनपीएची विश्वस्त पदाची १५ नोव्‍हेंबरला निवडणूक
जेएनपीएची विश्वस्त पदाची १५ नोव्‍हेंबरला निवडणूक

जेएनपीएची विश्वस्त पदाची १५ नोव्‍हेंबरला निवडणूक

sakal_logo
By

उरण, ता. २५ (वार्ताहर) : दीड वर्षापासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामकाज विश्वस्त पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या १५ नोव्‍हेंबरला निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी एका पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे जेएनपीएमध्ये दिवाळीत प्रचाराची लगबग सुरू होणार आहे. सध्या जेएनपीएच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांची निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी जेएनपीटीऐवजी पोर्ट ॲथोरिटी ॲक्ट स्थापन झाला आहे. त्यामुळे जानेवारीपासून बंदराचे कामकाज ॲथोरिटी ॲक्टनुसारच सुरू आहे. प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. दरम्यान, निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्‍ही कामगार ट्रस्टीची मुदत वर्षापूर्वीच संपली आहे. त्यांना मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात निवडणूक घेणे अपेक्षित होते. केंद्रीय कामगार आयुक्तांनी २ ऑगस्टला निवडणूक घेण्याचे निर्देशही दिले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची त्यापूर्वी निवड न केल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विविध कामगार संघटनांच्या मागण्यांमुळे कामगार विश्वस्त पदाची निवडणूक १५ नोव्‍हेंबरला जाहीर करण्यात आली आहे.

चार संघटना रिंगणात?
जेएनपीएत सध्या ६५३ कामगार शिल्लक आहेत. मागील वर्षी स्वेच्छानिवृत्ती जाहीर झाल्यानंतर जवळजवळ ५०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्त झाले. जेएनपीएत सध्या चार मान्यताप्राप्त कामगार संघटना आहेत. त्यामध्ये जेएनपीटी कामगार एकता संघटना, न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन आणि न्हावाशेवा पोर्ट एण्ड जनरल वर्कर्स युनियन या संघटना या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे या संघटनांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.